बीजिंग, ता. २५ (पीटीआय) : भारत आणि बांगलादेशातील वादाचा मुद्दा असलेल्या तिस्ता पाणीवाटप प्रकरणात चीनने सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकरणी मदत करण्याच्या बांगलादेशच्या विनंतीला चीनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तिस्ता नदीसह इतर नद्यांच्या जलव्यवस्थापनातही सहकार्य करण्याची तयारी चीनने दर्शविली आहे.
चीनच्या दौऱ्यावर असलेले बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रेहमान यांनी आज चीनचे जलसंपदा मंत्री ली गुओयिंग यांची भेट घेतली. यावेळी हा जलव्यवस्थापनातील सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान रेहमान हे या दौऱ्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, पंतप्रधान ली कियांग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ली गुओयिंग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रेहमान यांनी बांगलादेशातील नद्यांच्या खोलीकरणाच्या कार्यक्रमावर भर दिला. तिस्ता नदी व्यवस्थापन प्रकल्पासाठी चीनने तांत्रिक मदत द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
चीनच्या मंत्र्यांनी बांगलादेश सरकारच्या जलसंपदा व्यवस्थापनातील उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. २००५ मध्ये ढाका आणि बीजिंग दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराचा आणि गेल्या वर्षी चिनी जलतज्ज्ञांनी केलेल्या बांगलादेश दौऱ्याचा संदर्भ देत ली म्हणाले की, जलसंपदा व्यवस्थापनातील दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य हे व्यावहारिक आणि संशोधनावर आधारित आहे. तिस्ता प्रकल्प हा भारत-बांगलादेश संबंधांमधील एक संवेदनशील विषय आहे. फेब्रुवारीमध्ये रेहमान सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये सुधारणा दिसून येत आहे. यापूर्वी महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात हे संबंध ताणले गेले होते.
तिस्ता नदीचे महत्त्व
तिस्ता नदी पूर्व हिमालयातून सिक्कीम आणि पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात प्रवेश करते. ही नदी लाखो लोकांसाठी सिंचन आणि उपजीविकेचे मुख्य साधन आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांना जोडणाऱ्या संवेदनशील सिलिगुडी कॉरिडॉरजवळ असलेल्या तिस्ता नदीच्या सर्वसमावेशक व्यवस्थापन आणि पुनरुज्जीवन प्रकल्पात चीनने अनेक वर्षांपासून रस दाखवला आहे. १९९६ मध्ये गंगा नदीच्या पाणीवाटपासाठी ३० वर्षांसाठी झालेला करार यावर्षी संपणार असल्याने या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.