indrayani  sakal
पुणे

Pune : इंद्रायणीचे प्रदूषण मुख्यमंत्र्यांच्या दरबारी,प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कार्यवाही सुरू

सकाळ’च्या वृत्तमालिकेची दखल : प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कार्यवाही सुरू

सकाळ वृत्तसेवा

आळंदी : वारकऱ्यांसाठी श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाकडे ‘सकाळ’ने शनिवारी (ता. २) पुन्हा लक्ष वेधले. त्याचा आधार घेत पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले. त्यांच्यामार्फत प्रधान सचिवांनी महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाची कानउघाडणी केली. त्यानंतर दोन्ही आस्थापनांच्या अधिकाऱ्यांनी इंद्रायणीची पाहणी केली आणि ‘काही अनधिकृत कारखान्यांमधून बेकायदा कृत्य चालू असल्याचे निदर्शनास आले. चिखली नाल्यातून नदीपात्रात सांडपाणी शिरत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यातील दोषींवर कारवाई केली जाईल,’ अशी भूमिका घेतली आहे. मात्र, इतके हे दिवस अधिकाऱ्यांना दिसत नव्हते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय, इंद्रायणीचे प्रदूषण पूर्णपणे थांबवण्यासाठी राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीसह कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे.

तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदी येथून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत पर्यावरण प्रेमींसह ‘सकाळ’ने वारंवार महापालिका, पीएमआरडीए, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधले. मात्र, कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्त अधिकाऱ्यांनी काहीही उपाययोजना केल्या नाहीत.‌ आता कार्तिकी वारीच्या तोंडावर गेल्या दोन दिवसांपासून नदी पुन्हा फेसाळली आहे. त्याकडे ‘सकाळ’ने प्रशासन व सरकारचे लक्ष वेधत शनिवारी (ता. २) ‘कार्तिकीतही इंद्रायणीत रसायनमिश्रित सांडपाण्याचा मारा’ असे वृत्त प्रसिद्ध केले. त्यासह ‘सकाळ’ने यापूर्वी प्रसिद्ध केलेले वृत्तांत पर्यावरणप्रेमींनी खासदार, आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवून उपाययोजनेचे साकडे घातले. त्यानंतर राज्य सरकारच्या पर्यावरण विभागातील प्रधान सचिवांकडून चक्रे फिरली आणि महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारनंतर इंद्रायणीची पाहणी केली.

मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

शिंदे गटातील शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्‍न गांभीर्याने घेतला आहे. नदी प्रदूषण करणाऱ्‍या घटकांवर कडक कारवाईची गरज आहे. तसेच त्यांना कोणी पाठीशी घालणार असतील तर थेट कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी निक्षून सांगितले. इंद्रायणी नदी स्वच्छता आणि संवर्धनाबाबत स्वतः मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर आहेत.

दोन कारखाने ‘सील’

मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवी आंधळे, उप प्रादेशिक अधिकारी मंचक जाधव, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून चिखली- कुदळवाडी भागातून होणाऱ्या नदी प्रदूषणाची, परिसरातील काही लघुउद्योग, महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पाची पाहणी केली. प्रदूषण करणारे घटक कोणते याची तपासणी केली. यावेळी दोन कारखान्यांचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्याचे निदर्शनास आले. ते कारखाने ‘सील’ करण्याचे तोंडी आदेश प्रादेशिक अधिकारी आंधळे यांनी प्रत्यक्ष जागेवरच दिले.

पाण्यावर फेस कायम

इंद्रायणी नदीतील प्रदूषणाचा पांढरा फेसयुक्त तवंग शनिवारीही तरंगताना दिसला. नदीच्या उगमस्थानापासून संगमापर्यंतची गावे व शहरे व तेथील प्रशासकीय अधिकारी प्रदूषणासाठी दुसऱ्यांकडे अंगुली निर्देश करतात. मात्र, नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी कोणीच बंद करू शकत नसल्याचे विदारक चित्र आहे.

संयुतकृती हवी

सांडपाणी वाहून नेणारे नाले, ओढे भूमिगत गटारांचा शोध घेतला पाहिजे. सांडपाण्याचा थेट नदीत येणारा प्रवाह कारवाई करून बंद करणे गरजेचे आहे. वारीसाठीच नाही तर अन्य वेळेतही प्रशासन आणि राजकीय मंडळींनी एकमेकांकडे बोट दाखविण्यापेक्षा संयुक्तपणे प्रत्यक्ष कृती व कार्यवाही करणे गरजेचे बनले आहे.

धरणांतून विसर्ग, पण...

कार्तिकी वारी अर्थात संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा पाच डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्या आधीच वारकरी आळंदीत येतात. प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केलेल्या आदेशानुसार, वडिवळे आणि आंद्रा धरणातून एकत्रित अडीचशे क्युसेक पाणी नदीत सोडले आहे. मात्र प्रदूषित पाण्याचा प्रवाह जादा असल्याने आणखी काही दिवस पाणी निवळण्यासाठी लागतील.

वारकऱ्यांना हवं स्वच्छ पाणी

वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी नगरपालिकेच्यावतीने सिद्धबेट बंधारा, ज्ञानेश्वरी मंदिर आणि गरुड स्तंभ याठिकाणी कर्मचारी लावून जलपर्णी व कचरा काढला जात आहे. वारी काळात सिद्धबेट, इंद्रायणीनगर, भक्ती सोपान पूल या ठिकाणच्या घाटावर भाविकांची तीर्थस्नानासाठी विशेष गर्दी असते. या ठिकाणचे पात्र स्वच्छ करून, स्वच्छ पाणीपुरवठा केला तरच स्नानासाठी गरज भागेल, अशी परिस्थिती सध्या आहे.

अस्थिविसर्जन बंद व्हावे

इंद्रायणीच्या दोन्ही घाटावर आळंदीसह शहरी भागातील कपडे सर्रास धुतले जातात. अस्थिविसर्जनाबरोबर निर्माल्य, मृतांचे कपडे, छायाचित्रे नदीत फेकले जातात. परिणामी प्रदूषणात वाढ होत आहे. यावर बंदीची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका अधिकारी यांनी मिळून संयुक्त इंद्रायणी प्रदूषण करणाऱ्या घटकांची पाहणी चिखली कुदळवाडी हद्दीत केली. यामध्ये काही अनधिकृत कारखाने आढळले. त्यामधून बेकायदा कृत्य सुरू असल्याचे निदर्शनास आले. अशांवर कारवाई केली जाणार आहे. या परिसरात संपूर्ण फिरून पाहणी केली. चिखली नाल्यातून नदीपात्रात सांडपाणी शिरत आहे, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत आम्हाला राज्य सरकारच्या पर्यावरण विभागातील प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार पाहणी आणि कारवाई केली जाईल.

- रवी आंधळे,प्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चौदा एसटीपी प्रकल्प आहेत. कुदळवाडी चिखली भागातील नाल्यातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे तीस एमएलडीचा प्रकल्प येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर तो कार्यान्वित होईल. परिणामी किमान ऐंशी टक्के सांडपाण्यावर पूर्ण प्रक्रिया होईल.

- मंचक जाधव,उपप्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT