Panchnama
Panchnama Sakal
पुणे

‘रोगा’पेक्षा उपाय जालीम!

सु. ल. खुटवड

वळकुटी गावात तरारून आलेले भातपीक अचानक वाळू लागल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली. त्यांनी तलाठी भाऊसाहेबांच्या कानावर हा प्रकार घातला. पण भाऊसाहेबांना गावात जायला सवड मिळेना. ‘आज जाऊ, उद्या जाऊ’ असे करीत त्यांनी पंधरा दिवस घालवले. शेवटी ‘वादातील शेतजमीन एकाला विकायचीय. मोठं कमिशन सुटेल’ असे सांगितल्यावर ते आले व त्यांनी भातपिकाची पाहणी केली. त्यानंतर अहवाल तयार करण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांनी चाल-ढकल केली. शेवटी पंधरा दिवसांनी कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी रिपोर्ट पाठवला. मात्र, ‘उद्या पाहणी करतो’ असं सांगून तब्बल वीस दिवसांनी त्यांचाही ‘उद्या’ उजाडला व ‘भातपिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे’, असा निष्कर्ष त्यांनी काढला व तसा अहवाल त्यांनी वरिष्ठांकडे पाठवला. त्यानंतर त्यांची ही फाइल अनेक विभागात फिरत राहिली. प्रत्येकजण त्यावर शेरा मारुन ती पुढे पाठवत होता.

‘वळकुटी गावात अळी’ असं शेरा वाचून ‘अळीमिळी गुपचिळी’ असा शेरा एका अधिकाऱ्याने मारल्यानंतर बरेच दिवस ती फाइलच गायब झाली. त्यानंतर काही दिवसांनी परत तिचा प्रवास सुरु झाला. ‘गावातील पाण्यात अळ्या झाल्यात तर आरोग्य खात्याला कळवून पाण्यात औषधे टाका’ असा एका अधिकाऱ्याने शेरा मारुन, ती फाइल आरोग्य खात्याकडे वर्ग करण्यात आली. कागदी घोडे नाचविण्याची आपल्या नोकरशाहीची परंपरा असल्याने आरोग्य खात्यातही ती फाइल दोन महिने फिरत राहिली. त्यानंतर ती पुन्हा स्वगृही परतली.

‘वळकुटी गावात लष्करी अळी आली असून, तातडीने उपाययोजना करा’ या शेऱ्याचे पुढे ‘वळकुटे गावात तातडीने लष्कर पाठवा’ असे रुपांतर होत गेले. मंत्रालयात ही फाइल गेल्यानंतर ‘लष्कर पाठवा’चा शेरा पाहून, हा विषय आपल्या अंतर्गत नसून, संरक्षण खात्याशी संबंधित आहे, असे पाहून ही फाइल तिकडे पाठवली व तातडीने वळकुटी गावाला लष्कर पाठवावे, असे विनंतीपत्रही त्या फाइलला जोडले.

इकडे गावात मात्र लष्करी अळीच्या मुद्यावरून वातावरण तंग झाले होते. तातडीने उपाययोजना न झाल्याने संपूर्ण भातपिकाचे नुकसान झाले. शिवाय वर्षभरात भरपाई म्हणून एक रुपयाही न मिळाल्याने ग्रामस्थांनी त्याचा सगळा रोष सरपंच मारुती जगनाडे यांच्यावर काढला. या कामी दिनेश सरपाले यांनी ग्रामस्थांना चांगलीच फूस लावली.

‘मी सरपंच असतो तर भातपिकावरील रोगराई संपूर्ण आटोक्यात आणली असती. समजा नसती आली तर शंभर टक्के नुकसानभरपाई मिळवून दिली असती,’ असे भेटेल त्याला सांगून रान पेटवून दिले. लोकांची नाराजी वाढत चालल्याने जगनाडे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला व आलेल्या संधीचा फायदा उठवत सरपाले सरपंच झाले.

यंदा भातपीक जोमाने आल्याचे पाहून ‘मी सरपंच झालो म्हणूनच भातपीक एवढे तरारून आले आहे,’ असे सांगत ते गावात हिंडू लागले.

एका रात्री गावात घरफोडी झाल्याचा प्रकार घडला. किरकोळ रक्कम व जुनी कपडे चोरीला गेले होते. यावर सरपाले यांनी थेट तालुक्याचे गाव गाठून ‘गावाला संरक्षण पुरवावे’ या मागणीचे निवेदन त्यांनी सभापती व पोलिसांना दिले.

दरम्यान, मंत्रालयातील पत्र संरक्षण खात्याला मिळाल्यानंतर त्यांनी त्याची दखल घेतली व लष्करी तुकडी त्यांनी वळकुटी गावाला पाठवली. लष्कराच्या गाड्या गावात पोचल्यानंतर हत्यारबंद जवान त्यातून उतरू लागले व गावात त्यांनी संचलन केले. त्यानंतर ‘गावात साधी घरफोडी झाली तर मी लष्कराला पाचारण केलं. माझी ओळख पार दिल्लीपर्यंत आहे. आधीच्या सरपंचाला हे जमलं असतं का?’’ असं म्हणून मिशांना तूप लावून सरपंच सरपाले गावभर फुशारक्या मारत फिरू लागले.

सु. ल. खुटवड

(९८८१०९९०९०)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT