मंचर (पुणे) : ""पुणे जिल्ह्यातील लॉकडाउन शिथिल करत असताना नागरिकांना सहजपणे कळेल अशा भाषेत मार्गदर्शक सूचना कराव्यात. उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देताना अटी व सूचना सुस्पष्ट असाव्यात. आदिवासी भागात पाणीटंचाई निर्माण होऊ नये व पावसाळा लक्षात घेऊन शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करा,'' अशा सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केल्या.
जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली या भागातील लॉकडाउन शिथिल करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. बी. नांदापूरकर, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, जिल्हा आरोग्य पोलिस उपायुक्त स्मिता पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे, जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, पोलिस उपअधीक्षक दीपाली खन्ना, उपविभागीय अधिकारी संजय तेली, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी सहभागी झाले होते.
"जुन्नर तालुक्यात द्राक्ष शेतीच्या कामासाठी शेतमजूर वर्ग प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातून येतो. त्यांना नगर व नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीतून परवानगी मिळत नाही,' असे डॉ. कोल्हे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर, "यासंदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मार्ग काढू,' असे प्रसाद यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकीच्या सुरूवातीलाच जुन्नर तालुक्यातील आढावा आणि उपाययोजनेबाबत पुरेशी माहिती देता न आल्याबद्दल प्रसाद यांनी नापसंती व्यक्त केली. तसेच, पुरेशी तयारी करून माहिती देण्याचे आदेश जुन्नरच्या तहसीलदारांना दिले. तसेच, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली या तालुक्यातील लॉकडाउन काळात पोलिस प्रशासनाने चांगले काम केल्याबद्दल डॉ. कोल्हे यांनी त्यांचे कौतुक केले.
बॉयलर कंपन्यांबाबत निर्णय
चाकण व रांजणगाव एमआयडीसीतील काही कंपन्यांना विशेषतः बॉयलर असणाऱ्या कंपन्या 24 तास चालू ठेवणे आवश्यक असते. पण, लॉकडाउन शिथिल करताना रात्रपाळीत कंपनी सुरू ठेवण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत, ही बाब डॉ. कोल्हे यांनी लक्षात आणून दिली. "आवश्यक कामगार वर्गाची निवासाची व्यवस्था कंपन्यांनी केली, तर रात्रपाळीत कंपनी सुरू ठेवण्यास परवानगी देता येईल,' असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.