पुणे - संसदेत मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यासह ‘एआरसी’विरोधात शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पडसाद उमटले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संविधान स्तंभ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘सीएए से आझादी’, ‘एनआरसी से आझादी’ अशा घोषणांनी विद्यापीठाचा परिसर दणाणून गेला.
एनआरसी विरोधी कृती समितीतर्फे बुधवारी सायंकाळी पुणे विद्यापीठात या मोर्चाचे आयोजन केले होते. खासदार सुप्रिया सुळे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यामध्ये सहभागी झाले होते. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून या मोर्चाला सुरुवात झाली. मशाल पेटवून हलगीच्या तालावर मोर्चात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनी घोषणाबाजी सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची तुलना हिटलरशी करणारे तसचे देशाच्या संविधानाच्या हेतूलाच सुरूंग लावला जात आहे, अशा आशयाचे फलक हातामध्ये घेऊन या कायद्याचा कडाडून विरोध केला. आंबेडकर पुतळा येथे तरुणांनी गाणी सादर केल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला.
सोमवारी विद्यापीठात शहरातील पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले होते. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले.
भाजप सरकारने संविधानविरोधी कायदा केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलन करण्यासाठी, देश वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणे, हे दुर्दैव आहे. आंदोलन करताना काही जण उचकविण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी आंदोलन शांततेत झाले पाहिजे.
- सुप्रिया सुळे, खासदार
संभाजी उद्यानासमोर अासामी विद्यार्थी एकत्र
पुण्यात स्थायिक झालेल्या आसामी विद्यार्थ्यांचे आंदोलन दोन दिवसांपूर्वी दडपल्यानंतर आसामी नागरिक बुधवारी पुन्हा सकाळी जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यानासमोर एकत्र आले. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही; पण या कायद्यामुळे स्थानिक आसामी अल्पसंख्याक होतील, अशी भीती आहे. त्यामुळे हा कायदा रद्द झाला पाहिजे, असे बिद्युत सैकिया यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.