पेटोपिया
---------
कुत्र्यांच्या जगातला सिंह!
---------
‘कुत्ता चाहे तो भी शेर नहीं बन सकता...’ असे ‘डायलॉग्ज’ चित्रपटांत ऐकायला मिळतात. पण कुत्रा सिंह होऊ शकला नाही तरी तो सिंहासारखा दिसू नक्कीच शकतो. निदान ‘तिबेटियन मॅस्टिफ’ प्रजातीचा कुत्रा ‘अपुन तो शेर ही हैं’ असे निश्चित म्हणू शकेल! याचे कारण म्हणजे त्याचा आकार, मोठे डोके, जाड व दाट फर आणि मानेवर चक्क सिंहासारखी आयाळ. कुत्र्यांच्या जगातील या सिंहाविषयी आज जाणून घेऊया.
----------
सरासरी उंची
नर- २६ इंच
मादी- २४ इंच
वजन
नर- ४० ते ६८ किलो
मादी- ३१ ते ५४ किलो
आयुष्यमान
१० ते १२ वर्षे
प्रकार
लायन हेड तिबेटियन मॅस्टिफ- मानेवर आयाळ व लांब केस असलेले.
टायगर हेड तिबेटियन मॅस्टिफ- तुलनेने शॉर्ट फर असलेले.
-------------
मूळचे कुठले?
ही हिमालयीन भागात- प्रामुख्याने तिबेटमध्ये वाढवली गेलेली प्राचीन प्रजाती मानली जाते. तिबेटियन मॅस्टिफसारख्या कुत्र्यांविषयीच्या ३००० वर्षांपूर्वीच्या लिखित नोंदी चीनमध्ये आढळल्या आहेत. ते कुत्रे आजच्या तिबेटियन मॅस्टिफचे पूर्वज मानता येतील. वर्षानुवर्षे पश्चिम आशिया, पर्शिया, तसेच ग्रीक व रोमन सैन्याच्या गटांबरोबर हे कुत्रे असत. डोंगराळ भागातील गुराखी आणि तिबेटमधील बौद्ध भिक्षूंनी या प्रजातीस राखणीसाठी आपलेसे केले. आता मात्र हे कुत्रे नैसर्गिकरित्या आढळणे दुर्मीळ आहे. राजेशाही रूपामुळे शहरांत त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर ‘शो-डॉग’ म्हणून होऊ लागला आणि व्यावसायिक ‘ब्रीडर्स’मार्फत ते वाढवले जाऊ लागले.
-------------
स्वभाव कसा?
आकार आणि रूपाने मोठा दिसला तरी हा कुत्रा शांत आणि एकटे राहायला आवडणारा असतो. अनोळखी माणसांपासून तो शक्यतो दूरच राहतो आणि कधी कधी आपल्या मोठ्या शरीराचा वापर करून माणसांना घाबरवणे त्यांना आवडते. मालकांच्या संरक्षणासाठी हे कुत्रे अतिशय सजग असतात. या कुत्र्यांना प्रशिक्षण देणे अवघड समजले जाते, कारण ते आपल्या मर्जीचा मालक असतात. आपण जर त्यांच्या स्वतंत्र बाण्याशी जुळवून घेण्यास तयार असू, तर मात्र त्यांच्याशी चांगली मैत्री करता येते. चीनमध्ये हे कुत्रे मोठ्या प्रमाणावर पाळले जातात आणि ते घरी असणे प्रतिष्ठेचे मानले जाते.
-------------
अतिशयोक्ती नको!
दोस्तांनो ‘तिबेटियन मॅस्टिफ’ सिंहासारखा राजेशाही दिसतो याच वादच नाही. पण या कुत्र्याचे कौतुक करताना अनेकदा अतिशयोक्ती केली जाते. ‘सिंहाला भारी पडणारा कुत्रा’ असे त्याचे वर्णन केले जाते. ते मात्र खरे नाही!
पूर्ण वाढलेला तिबेटियन मॅस्टिफ नर ४० ते ६८ किलो वजनाचा असतो, तर सिंहाचे सरासरी वजन असते १५० ते २५० किलो. सिंहाकडे अणकुचीदार नखे असलेले बलदंड पंजे असतात, जबड्यांत जबरदस्त ताकद असते.
तिबेटियन मॅस्टिफ आणि सिंहाची कुस्ती झाली, तर सिंह आपल्या मॅस्टिफला कदाचित मिनिटभरातच लोळवेल.
असे असले तरी रूबाबदारपणाच्या बाबतीत ‘कुत्र्यांच्या जगातील सिंह’ हे तिबेटियन मॅस्टिफचे बिरूद त्याच्याकडून काढून घ्यायचे कारण नाही!
-------------
भारतात तिबेटियन मॅस्टिफ?
- हिमालयीन प्रदेश सोडल्यास भारतात वातावरण उष्ण असते. तिबेटियन मॅस्टिफची जाड फर थंडीत राहण्यासाठी विकसित झाली आहे. त्यामुळे भारतात त्याच्यासाठी वातानुकूलन यंत्रणा लागेल, तसेच त्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
- आकार मोठा असल्यामुळे त्यांना जागा जास्त लागते. खेळायला व फिरायलाही मोकळी जागा आवश्यक असते. तेव्हा भारतात शक्यतो तिबेटियन मॅस्टिफ न पाळलेलाच बरा.
- भारतात या एका कुत्र्यांची किंमत २५ हजारांपासून तब्बल १० लाख रुपयांपर्यंत असू शकते.
- काही विशिष्ट परदेशी कुत्रे (उदा. पिटबुल) भारतात पाळताना योग्य काळजी न घेतल्यामुळे त्यांनी माणसांवर जबर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मार्च २०२४ मध्ये आपल्या केंद्र सरकारने सर्व राज्यांना असे सुचवले की विशिष्ट २३ प्रजातींच्या कुत्र्यांची आयात, विक्री व ब्रीडिंग यांस परवानगी देऊ नका. यात पिटबुल, बुलडॉग, रॉटवेलर यांच्यासह ‘मॅस्टिफ’ प्रजातींचा उल्लेख आहे.
- म्हणजेच ‘तिबेटियन मॅस्टिफ’वर आपल्याकडे सरसकट बंदी नसली, तरी त्यावर राज्या-राज्यानुसार कडक बंधने आहेत.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.