आंबेठाण, ता. ७ : चाकण एमआयडीसीअंतर्गत शेतकऱ्यांना परतावा स्वरूपात वाटप करण्यात आलेल्या जागेला पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने अपघात होत आहेत. चाकण एमआयडीसी भागात एमआयडीसीकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचे त्यांना वावडे आहे की काय? असा सवाल ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
वासुली फाटा भागात एमआयडीसीकडून प्रकल्पग्रस्त नागरिकांना रहिवासी घरांचे परतावे वाटप करण्यात आले. कित्येक वर्ष लोटली तरी या नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा दिल्या गेल्या नाहीत. या भागातील नागरिकांच्या इमारतींच्या गटाराचे पाणी रस्त्याच्या कडेला सोडून द्यावे लागत आहे. दिवसरात्र हे पाणी सोडले जात असल्याने ते रस्त्यावरून धावत आहे. परिणामी रस्ता निसरडा झाला असून दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. तर एकाच ठिकाणी पाणी साचत असल्याने दुर्गंधी सुटून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. मच्छर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वासुली फाटा ते वासुली गाव असे जवळपास ४०० ते ५०० मीटर पाणी भर वर्दळीच्या रस्त्यावरून दिवसरात्र धावत आहे.
वासुली फाटा ते मिंडेवाडी गावची हद्द या अंतराच्या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. या कामात रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे आहेत, असे अंदाजपत्रकात नमूद होते. पण, ही गटारे का केली जात नाही? याचे कारण गुलदस्त्यात आहे. आमच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. भविष्यात हे असेच राहिले तर नागरिक रस्त्यावर उतरतील.
- साईनाथ पाचपुते, नागरिक
या रस्त्याच्या कामाची पाहणी केली असून लवकरच गटाराच्या पाण्याचे काय नियोजन करता येईल? याबाबत उपाययोजना केली जाईल. यासाठी ग्रामपंचायतीने देखील काही प्रमाणात पुढाकार घेतला पाहिजे.
- सतीश चौडेकर, उपअभियंता एमआयडीसी
मी दररोज वासुली फाट्यापासून शिंदे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने जातो. परंतु, या मार्गावर गटाराचे पाणी रस्त्यावर नेहमी वाहत असल्याने आज गाडी घसरून मी पडलो. माझा हात मोडला आहे. काल माझा सहकारी पडला गाडीच्या सायलेन्सरमुळे त्याच्या पायाला भाजले आहे. या भागात गटाराची सुविधा होणे गरजेचे आहे.
- अर्जुन कांगने, दररोजचे प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.