आंबेठाण, ता. १३ : एमआयडीसीच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थित आणि सुरळीत व्हावी यासाठी नूतनीकरण करण्यात आलेला चाकण ते वासुली फाटा रस्ता (ता. खेड) प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरील आंबेठाण ते वराळे या दरम्यान मागील दहा दिवसांत पाच मृत्यू झाले आहे. यात कामगार वर्गाचे प्रमाण जास्त आहे.
चाकण शहर आणि एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनला जोडण्यासाठी चाकण ते आंबेठाण रस्ता महत्त्वाचा आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी या मार्गाचे हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत नूतनीकरण करण्यात आले. रस्ता मोठा आणि सिमेंट काँक्रिट झाल्याने स्थानिक नागरिकांसह प्रवासी आणि कारखानदारांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर चाकण-तळेगाव रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मार्गे वाहतूक वळविण्यात आली. विना खड्ड्यांचा रस्ता मिळाल्याने अनेक वाहनचालक याच मार्गाचा अवलंब करीत आहेत. परंतु त्यामुळे या मार्गावर जशी वाहनांची वर्दळ वाढली, तसे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
म्हाळुंगे फाटा अपघाताचा हॉटस्पॉट
नवीन रस्ता असल्याने अनेक वाहनचालक बेफिकिरीने वाहने चालवीत आहेत. आंबेठाण, वराळे, झित्राईमळा या भागात काही ठिकाणे ही अपघाताची केंद्रे ठरत आहेत. वराळे येथील म्हाळुंगे फाटा तर अपघाताचा हॉटस्पॉट ठरत आहेत. मागील आठ दिवसांत येथे तीन मृत्यू झाले आहेत, तर इतर ठिकाणी दोन अपघात झाले आहे. कामगार वेळेवर पोहचण्यासाठी वेगाने वाहन चालवत असतात. तसेच कारखान्यात अवजड वाहने, कंटेनरसारखी मोठी वाहने येत असतात. एकमेकांची वाहने पुढे नेण्याच्या स्पर्धेत अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहण्यासाठी या मार्गावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
वराळे भागात दिवसाआड अपघात होत आहेत. या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची गरज आहे. वास्तविक पाहता ज्यावेळी नवीन रस्ता झाला त्याचवेळी गावठाण परिसरात, विविध फाट्यांवर आणि धोकादायक ठिकाणी गतिरोधक टाकणे गरजेचे होते. परंतु आतातरी प्रशासनाने अधिक जीव जाण्याची वाट न पाहता तत्काळ यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
-दिनेश लांडगे, माजी सरपंच, वराळे
चालू वर्षीच्या सेफ्टी ऑडिट रिपोर्टमध्ये संबंधित अपघात स्थळांची पाहणी करू आणि अपघात होऊ नये यासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची गरज असेल त्या केल्या जातील.
-भाग्यश्री गिरी, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.