पुणे

चाकण-वासुली फाटा रस्ता ठरतोय मृत्यूचा मार्ग

CD

आंबेठाण, ता. ६ : पुणे-नाशिक महामार्ग आणि चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनसाठी दुवा ठरलेला चाकण ते वासुली फाटा रस्ता (ता. खेड) नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. विशेषतः तरुण पिढी या सापळ्यात अडकत आहे. ढिम्म प्रशासन आणि राजकारण्यांची बोलबच्चनगिरी या रस्त्यावर होणाऱ्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग अस्तित्वात आहे की नाही, असा सवाल यामुळे निर्माण होत आहे.

शासनाच्या हायब्रीड एन्यूटी अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत चाकण ते वासुली फाटा आणि पुढे पडवळ वस्ती ते करंजविहिरे (ता. खेड) अशा दोन टप्प्यांत रस्ता रुंदीकरण करून नूतनीकरण केला. चाकण-तळेगाव रस्त्याला हा समांतर रस्ता असल्याने आणि तळेगाव मार्गावरील वाहनांची वर्दळ पाहता वाहनचालक चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधून पुणे-नाशिक महामार्गावर येतात. परिणामी या मार्गावरील अवजड वाहनांची संख्या वाढल्याने रस्ता अरुंद पडत आहे.

वास्तविक पाहता एमआयडीसीचे मोठे विस्तारलेले क्षेत्र पाहता मोठ्या आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग पाहिजे. परंतु जुन्याच प्रमुख जिल्हा मार्गाचे रुंदीकरण आणि नूतनीकरण केले. चाकण-तळेगाव रस्त्याच्या तुलनेत हा सिमेंट रस्ता असल्याने या मार्गावरील वाहतूक वाढली. अगदी तळेगाव चौकातून म्हाळुंगेला जाणारे लोक सुद्धा याच मार्गाने येऊ लागले. त्यामुळे रस्ता अरुंद आणि वाहने कितीतरी पटीने अधिक अशी स्थिती झाली. त्याचा परिणाम या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन अपघाताची संख्या वाढली.

ढिम्म प्रशासन आणि बोलबच्चन पुढारी
चाकण भागात एमआयडीसीचे चार टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्यासाठी संपादन प्रक्रिया सुरू आहे. तर काही संपादित जागेवर कारखाने उभे राहत आहे. या भागात एमआयडीसी विस्तारत असताना मोठे आणि पक्के रस्ते होणे गरजेचे होते. परंतु याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणतात की, एमआयडीसी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी रस्ते करणे गरजेचे आहे. पण एमआयडीसी मात्र सोयीसुविधा देण्याकडे ढुंकूनही पाहत नाही. खेड तालुक्यातील राजकीय पुढारी तर फक्त बोलबच्चनगिरी करण्यात व्यस्त आहेत.एकंदरीत राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे अधिकारी मोकाट असून त्यांना जनतेच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे दिसते.


अपघातांची मालिका
बिरदवडी गावच्या हद्दीत शुक्रवार (ता. ३१) ला अवजड वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात कोरेगाव येथील दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोघेही कुटुंबात एकुलते एक होते. त्यापूर्वी आंबेठाण येथील कंपनीच्या गेटसमोर घडलेल्या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. त्या अगोदर कोरेगाव फाटा, हॉटेल रानवारा, हॉटेल राजमुद्रा समोर, भांबोली फाटा, एमआयडीसी पाण्याच्या टाकीजवळ, वासुली फाटा येथील अपघातात आजवर जवळपास ५० ते ५५ जीव गेले आहेत. याशिवाय लहानमोठे अपघात हे नित्याचे ठरलेले असून त्यातून कितीतरी जणांना अपंगत्व आलेले आहे.

रस्त्याची अपूर्ण कामे
कोट्यवधी रुपये खर्चून सिमेंट रस्ता केला परंतु अनेक ठिकाणी रस्त्याची कामे बाकी आहेत. रस्त्याच्या कडेला एक मीटरच्या सिमेंटच्या पट्ट्या करणे अनेक ठिकाणी बाकी आहे. काही ठिकाणी विजेचे खांब मध्ये येत असल्याने ठेकेदाराने तेथील काम अपूर्ण ठेवले आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनीने वीजवाहिनीच्या तारा बाहेरून काढणे गरजेचे होते. त्यांच्या अनास्थेमुळे संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी रस्ता करणे सोडून दिले. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गटारे मार्गस्थ करून देणे गरजेचे असते, खचलेल्या साइडपट्ट्या दुरुस्त करणे गरजेचे असते पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग तर आहे की नाही असा सवाल निर्माण होत आहे.

निष्क्रिय एमआयडीसी प्रशासन
आजवर तालुक्यात एमआयडीसीला शेतकऱ्यांचा विरोध असतानाही एमआयडीसीने बळाच्या जोरावर शेतकऱ्यांकडून जागेचा ताबा घेतला आणि त्या जागा उद्योजकांना दिल्या. चाकण भागात वाहतूक कोंडी प्रमुख प्रश्‍न आहे. आणि ही कोंडी सोडवण्यासाठी नवलाख उंबरे एमआयडीसीकडून आलेला रस्ता पुणे-नाशिक महामार्गाला जोडणे अतिशय गरजेचे आहे. हा रस्ता वराळे पर्यंत झाला असून पुढे पाचव्या टप्प्यात काही भागात झाला आहे. एमआयडीसी जशी जागा संपादन करण्यासाठी बळ वापरते तसे बळ रस्त्यासाठी जागा संपादन करताना का वापरत नाही? जर एमआयडीसीने ७५ मीटर रुंदीचा रस्ता तत्काळ मार्गी लावला तर चाकणच्या वाहतुकीचा मोठा प्रश्‍न मार्गी लागेल, अशी परिस्थिती आहे.

एमआयडीसी आणि चाकण भागात रस्ते अतिशय खराब आहेत. गरज आहे तेथे गतिरोधक नसल्याने अपघात होतात. साइड पट्ट्या नाहीत, खराब रस्ते आहे, एमआयडीसी रस्ते करते पण गटारे करीत नाही अशी अवस्था आहे. तळेगाव रस्त्यावरील जड वाहतूक बंद केल्याने ती वाहने आंबेठाण रस्त्यावर येतात. परिणामी इकडे वाहतूक कोंडी होते. प्रवासात वेळ जात असल्याने इंधन मोठ्या प्रमाणात जात आहे. कामगार वेळेत घरी किंवा कंपनीत पोहोचत नाही. पोलिस यंत्रणेवर ताण वाढत आहे.
-दत्तात्रेय भेगडे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशन

एमआयडीसी आणताना मोठ्या रस्त्यांचे जाळे गरजेचे होते पण त्याकडे एमआयडीसी दुर्लक्ष करीत आहे. पूर्वीचेच रस्ते नूतनीकरण करून वापरले जात आहे.चाकण-वासुली फाटा दरम्यानच्या रस्त्यावर अवजड वाहनांची संख्या वाढल्याने सतत वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. बेशिस्त अवजड वाहनचालकांमुळे जीवघेण्या अपघातांची संख्या वाढली आहे.
- बाबासाहेब पवार, माजी सरपंच, बिरदवडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : तरुणांना १५ हजार रुपये मिळणार....पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा...काय आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना?

Independence Day: दिवाळीत मोदी देशाला देणार मोठे गिफ्ट, GST बद्दल केली मोठी घोषणा, करात मिळणार दिलासा

PM Narendra Modi Speech Live Update : राष्ट्रीय सुरक्षा कवच २०३५ पर्यंत आणखी मजबूत करणार- पंतप्रधान मोदी

Independence Day 2025 PM Modi : अणुधमक्यांना घाबरणार नाही, ब्लॅकमेल केलं तर...; मोदींचा लाल किल्ल्यावरून असीम मुनीरला इशारा!

Independence Day 2025 : आता मेड इन इंडिया 'सेमीकंडक्टर' चिप बाजारात येणार, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन 'आत्मनिर्भर'ची गर्जना

SCROLL FOR NEXT