आंबेठाण, ता. १९ : वर्षानुवर्षे ज्या मातीत पिके घेऊन आमचा उदरनिर्वाह आम्ही केला, आज ती जमीन शासन उद्योगधंद्याकरिता घेत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी म्हणून आम्हाला जमिनीच्या बदल्यात जमिनी द्या आणि मुख्य रस्त्याच्या कडेला गावालगत आम्हाला परतावे देऊन न्याय द्या, अशी प्रमुख मागणी बोरदरा (ता. खेड) येथील शेतकऱ्यांनी एमआयडीसीकडे केली.
चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचसाठी बोरदरा गावातील जमीन संपादित केली जात आहे; परंतु गावातील काही शेतकऱ्यांनी या संपादनाला विरोध केला आहे. शेतकऱ्यांनी विरोध केला असल्याने ६० मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम देखील रखडले आहे. परिणामी चाकण शहरासह एमआयडीसीत नित्याची वाहतूककोंडी नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. कॉर्निंग कंपनी ते पुणे- नाशिक महामार्ग या रस्त्याचे काम सुरू असून बोरदरा आणि आंबेठाण भागात शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम रखडले आहे. एमआयडीसीसाठी जमिनी जात असल्याने आम्ही भूमिहीन होऊ नये, यासाठी आम्हाला जमिनीच्या बदल्यात जमिनी द्या, घरांचे परतावे गावालगत म्हणजे ६० मीटर रुंदीच्या रस्त्याला द्यावेत, मुख्य रस्त्यालगत गावात विविध सोयीसुविधा राबविण्यासाठी आणि विकासकामे, तसेच पाणी योजनेसाठी किमान दोन एकर जागा द्यावी, अशा प्रमुख मागण्या सरपंच किरण पडवळ यांच्यासह उपसरपंच दत्तात्रेय बळवंत पडवळ, दशरथ पडवळ, विलास पडवळ, पंढरीनाथ पडवळ, दर्शन पडवळ, अमोल पडवळ, रामदास गोपाळ पडवळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
भांडवलदारांना जागा वाटप
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्याला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सोडून भांडवलदार लोकांना जागा वाटप केले आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करून अडचणीच्या ठिकाणी परतावे दिले जात आहेत, असाही आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे
चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमधील कॉर्निंग कंपनीपर्यंत चार पदरी रस्ता पूर्ण झाला आहे. पुढे टप्पा क्रमांक पाचमधून पुणे- नाशिक महामार्गापर्यंत काम सुरू आहे; परंतु बोरदरा आणि आंबेठाण भागात शेतकऱ्यांच्या विरोधामुळे काम रखडले आहे. याचा परिणाम चाकण शहरातील आणि एमआयडीसी भागातील वाहतूक कोंडीवर होत आहे. तळेगाव रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहने वाहतूक बंद असल्याने ती वाहने भांबोली, वराळे मार्गे आंबेठाण रस्त्याने पुणे-नाशिक महामार्गाला येऊन मिळतात; परंतु वाहतुकीच्या मानाने हा रस्ता अरुंद ठरत असल्याने वाहतूककोंडी होत असते. त्यासाठी एमआयडीसीने शेतकऱ्यांना न्याय देऊन रखडलेले संपादन करावे आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.