आंधळगाव, ता. ३ : न्हावरे - चौफुला राष्ट्रीय महामार्गावर नागरगाव (ता. शिरूर) येथील साठे पेट्रोलपंपाजवळ रस्त्याच्या अपूर्ण कामाचा अंदाज न आल्याने कार खोल खड्ड्यात कोसळल्याची घटना सोमवारी (ता. १) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक मात्र थोडक्यात बचावला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून न्हावरे ते चौफुला या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. न्हावरे ते रांजणगाव फाटा दरम्यान ठिकठिकाणी या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. मात्र या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही दिशादर्शक व माहिती फलक लावलेले नाहीत. पर्यायाने रस्त्याने जाणारा नवीन वाहन चालक रस्त्याचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याचे समजून वेगात आपले वाहन चालवतो. त्यामुळे याठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. अपघातांच्या घटना लक्षात घेऊन या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
न्हावरे ते चौफुला हा २५ किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. या रस्त्यावर घोडगंगा कारखाना, रिलायन्स कंपनी, ऊर्जा डेअरी, शेलार मळा, साठे पेट्रोल पंप या ठिकाणी रस्त्याचे एका बाजूचे ठिकठिकाणी काम अपूर्ण आहे. रस्त्याने पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या नवीन वाहनचालकांना रात्रीच्या वेळी या रस्त्याच्या अपूर्ण कामाचा अंदाज येत नाही. रस्त्याच्या प्रलंबित कामामुळे या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाच्या शाखा अभियंता ऋचा भरडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
न्हावरे ते रांजणगाव फाटा येथील अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण असल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये या परिसरात अनेक जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
संपत फराटे, अध्यक्ष, अखिल ग्राहक पंचायत, शिरूर
न्हावरे ते पारगाव दरम्यान अपूर्ण रस्त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी अपूर्ण कामामुळे रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन या रस्त्याचे काम पूर्ण करावे.
अजित सरोदे, ग्रामस्थ, आंधळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.