आंधळगाव, ता. १९ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. १५) बिबट्याच्या हल्ल्यात शिवतेज टेंभेकर या चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वनविभाग सक्रिय झाला आहे. जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहाय्यक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा येथील शेतात एकांतात असलेल्या २० घरांना प्रायोगिक तत्त्वावर सौर कुंपण बसविण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे.
फराटेवाडी परिसरातील सोमनाथ मारुती चाफळकर या शेतकऱ्याच्या घराभोवती प्रथम सौर कुंपण बसविण्यात आले. जुन्नर वनविभागाच्या सहाय्यक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी शनिवारी (ता. १८) चाफळकर यांच्या घराला भेट देत सौर कुंपण कामाची पाहणी केली. यामध्ये विशेष करून झटका मशिन, बॅटरी, सौरऊर्जा प्लेट व सौर कुंपण कसे कार्य करते, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच यापासून आपण कशी काळजी घ्यावी, हे उपकरण अधिकाधिक कसे टिकून ठेवता येईल, त्यासाठी कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी जुन्नरच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, अखिल ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष संपत फराटे, सोमनाथ चाफळकर, तसेच जुन्नर, शिरूर वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर व रेस्क्यू टीमचे सदस्य आदी उपस्थित होते.
सौर कुंपण कसे काम करते
शेतात एकांतात असलेल्या घरांमधील माणसांचे बिबट्यापासून संरक्षण व्हावे, या हेतूने सुरक्षित उपाययोजना म्हणून सौर कुंपणाचा वापर करण्यात येत आहे. या सौर कुंपणामध्ये इलेक्ट्रिक करंट सोडण्यात येतो. या तारेला प्राण्यांचा स्पर्श झाला, तर जोरात झटका बसतो व तो प्राणी दूर पळून जातो. तसेच तो प्राणी पुन्हा त्याठिकाणी येत नाही.
शेतात एकांतात असलेल्या घराला हे सौर कुंपण बसवले गेले, तर तेथील कुटुंब बिबट्यापासून सुरक्षित होऊ शकते. हे सौर कुंपण ३० हजार रुपये किमतीचे आहे. यामध्ये ७५ टक्के अनुदान लाभार्थी शेतकऱ्याला मिळणार आहे. २५ टक्के रक्कम शेतकऱ्याने भरायची आहे. सौर कुंपणासाठी लावण्यात येणारे पोल, त्यासाठी खोदण्यात येणारे खड्डे व लागणारे सिमेंट, मजुरीही शेतकऱ्याने द्यायची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरमालकाने ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेणे गरजेचे आहे.
-अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.