आंधळगाव, ता. १ : शिरूर तालुक्यातील आंधळगाव (वाडगेवस्ती) येथील लाखो रुपये खर्च करून उभारलेला जलशुद्धीकरण प्रकल्प गेली दोन वर्षे ग्रामपंचायतीकडून सुरूच करता आलेला नाही. त्यातच नुकताच तब्बल पाच लाख रुपये खर्चून या बंद प्रकल्पासाठी सोलर प्रकल्प बसवला गेल्याने निधीची उधळपट्टी झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
आंधळगाव ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण प्रकल्प बसवला होता. मात्र, तो सुरू करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले, अशी नागरिकांची नाराजी आहे. त्यामुळे विकतचे पाणी खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
खासगी व्यावसायिकांचा पाणी व्यवसाय जोरदार चालण्यासाठी शासनाचे निधीतून लाखो रुपये खर्च करून उभारलेला जलशुद्धीकरण प्रकल्प सहेतुक ग्रामपंचायतीने बंद ठेवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. यासाठी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी यात आर्थिक तडजोड केल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, आंधळगाव व नागरगाव या दोन गावांसाठी तब्बल २७ कोटी रुपयांची जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना चिंचणी येथून सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी पाणीपुरवठा योजना हाती येणार असतानाही बंद असलेल्या फिल्टरसाठी पाच लाख रुपये खर्च करून सोलर प्रकल्प उभारण्याची गरज काय होती, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ठप्प असलेला शुद्धीकरण प्रकल्प आता तरी सुरू होणार का, याबाबत शंका आहे. या शुद्धीकरण प्रकल्पाचा देखभाल दुरुस्तीचा कार्यकाळ संपला असून पुढील काळात प्रकल्प बंद पडल्यास त्यासाठी ग्रामपंचायतीला पुन्हा नव्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. एवढ्या मोठ्या रकमेत गावातील इतर विकासकामे झाली असती; पण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे निधीचा चुराडा झाला, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. तसेच पांढरेवस्ती व वाडगेवस्ती येथे लाखो रुपये खर्च करून बसवलेले दोन्ही जलशुद्धीकरण गेल्या अनेक वर्षांपासून बंदच आहेत. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
ग्रामपंचायतीने जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी नुकताच पाच लाख रुपयांचा खर्च करून सोलर प्रकल्प उभारला आहे. येत्या काही दिवसात हा प्रकल्प सुरू होऊन नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे.
- विशाल नाईकनवरे, ग्रामसेवक, आंधळगाव ग्रामपंचायत (ता. शिरूर)
आंधळगाव येथील जलशुद्धीकरण प्रकल्प ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे बंद पडलेला आहे.२७ कोटी रुपयांची योजना येत्या काही महिन्यात सुरू होणार असतानाही सोलर प्रकल्पासाठी पाच लाख रुपये खर्च करण्याची गरज होती का?
- कैलास खरात, सामाजिक कार्यकर्ते, आंधळगाव (ता. शिरूर)