आंधळगाव, ता. १२ : शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे वारंवार बिबट्यांचे दर्शन आणि पशुधनांवर हल्ल्यांच्या घटना होत असल्याने बिबट्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बेस अलार्म सिस्टिम बसवण्याची मागणी दहिवडीचे पोलिस पाटील जालिंदर पवार यांनी शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे पत्र देऊन केली आहे.
दहिवडी हे गाव बिबटप्रवण क्षेत्रात गणले जात असताना येथे वारंवार बिबट्यांचे दर्शन आणि पशुधनांवर हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. परिसरात शेती व उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याने भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे, तर काही ठिकाणी रानातून शालेय मुलांसह कामगारांना प्रवास करावा लागत असल्याने येथील बिबट्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी दहिवडी गावामध्ये बिबट्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बेस अलार्म सिस्टिम बसवण्याची मागणी दहिवडीचे पोलिस पाटील जालिंदर पवार यांनी वनविभागाच्या शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे पत्र देऊन केली आहे.
शिरूर तालुक्यातील विविध ठिकाणच्या बेस अलार्म सिस्टिम बसविण्याच्या मागणीबाबतचे अहवाल आपण वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवले आहेत. त्याबाबतची मंजुरी व निधी उपलब्ध होताच अलार्म सिस्टिम बसविण्यात येईल.
- निळकंठ गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर