मांडवगण फराटा, ता. १२ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील वारंवार अपघात होणाऱ्या रस्त्यांवर अखेर गतिरोधक बसविण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मांडवगण फराटा येथील प्रजिमा-१०० प्रमुख रस्ता (माऊली मंदिर ते तुकाई मंदिर)तसेच प्रजिमा-५३ मांडवगण फराटा–वडगाव रासाई या रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून, वेगमर्यादा नसल्याने येथे वारंवार अपघात घडत होते. मागील दीड वर्षात या मार्गांवर अपघातात सहा जणांना प्राण गमवावे लागले. या मार्गांवर वळणे, दाट वस्ती व रहदारी असल्याने नागरिक, विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सरपंच समीक्षा फराटे-कुरूमकर व ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वी दोन वेळा निवेदने देण्यात आली होती. रस्त्यांवरील अपघातांची माहिती, मृत्यू व जखमींच्या घटनांचा तपशील देत तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीची दखल घेत संबंधित ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे काम पूर्ण केले आहे.
गतिरोधक बसविल्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित होणार असून, भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या कार्यवाहीबद्दल नागरिकांनी सरपंच समीक्षा फराटे-कुरूमकर व संबंधित विभागाचे आभार मानले आहेत. तसेच रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक, वेगमर्यादा दर्शविणारे बोर्ड व झेब्रा क्रॉसिंग करावेत, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे मांडवगण फराटा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.