मांडवगण फराटा, ता. १ : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणातून लाभक्षेत्रासाठी रविवारी (ता.१) सकाळी आवर्तन सुरू करण्यात आले. उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर डावा व उजवा या दोन्ही कालव्यांना पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आल्याने शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कुकडी प्रकल्प अंतर्गत पहिले धरण म्हणून ओळख असलेल्या घोड धरणाच्या लाभक्षेत्रात सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश होतो. डाव्या कालव्यातून ४५० क्युसेक तर उजव्या कालव्यातून १५० क्युसेकने पाणी सोडले आहे. सध्या धरणात ६६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून हे आवर्तन अंदाजे २७ ते ३० दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.
घोड उजव्या कालव्याची लांबी ३० किलोमीटर असून समादेश क्षेत्र १३,८०० हेक्टर आहे.लागवडीयोग्य क्षेत्र १९,५६० हेक्टर तर ओलिताखालील क्षेत्र ६,९९० हेक्टर आहे. या कालव्याचा लाभ शिरूर तालुक्यातील १४ गावांना होतो. जानेवारी महिन्यात एक आवर्तन देण्यात आले होते. मात्र तापमानात वाढ होत असल्याने उन्हाळ्यातील पहिले आवर्तन तातडीने सुरू करण्यात आले.
शिरूर, श्रीगोंदा तसेच काही प्रमाणात कर्जत तालुक्यापर्यंत या धरणाचा सिंचनासाठी उपयोग होतो. या आवर्तनाचा शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा, इनामगाव, वडगाव रासाई, कुरुळी, शिरसगाव काटा, पिंपळसुट्टी व तांदळी या गावांना मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, धरणाखालील नदीपात्रातील पाच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सध्या कोरडे पडले आहेत. त्या भागातील शेतकऱ्यांकडून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून जलसंपदा विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती शाखा अभियंता वैभव काळे यांनी दिली.
उन्हाळी व रब्बी पिकांसाठी हे आवर्तन महत्त्वाचे ठरणार असून लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.
घोड धरणतून कालव्याला पाणी सोडण्याची आमची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती.वडगाव रासाई परिसरात पाणीटंचाई जाणवत असल्याने या आवर्तनाचा शेतीला निश्चितच मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
- योगेश शेलार, शेतकरी, वडगाव रासाई
02906
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.