मांडवगण फराटा, ता. २१ : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील गोळीबार प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, धडक कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ३० पोलिसांचे विशेष पथक तयार करून दिवसभर जोरदार शोध मोहीम राबवण्यात आली.
जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी थेट मांडवगण पोलीस चौकीत तळ ठोकत तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी गावासह परिसरात छापेमारीची मालिका सुरू ठेवली. या प्रकरणात मिथुन उर्फ अमोल आनंदा चौगुले, मिनीनाथ गव्हाणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, गावातील क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर फोटो न लावल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गट आमनेसामने येत वाद चिघळला आणि थेट गोळीबारापर्यंत पोहोचला. गुरुवारी (ता. १९) घडलेल्या या घटनेत दोन जण जखमी झाले असून, संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिथुन चौगुले यांच्या फिर्यादीनुसार सूत्रधार शिंदे, पप्पू कड, ऋतिक चव्हाण, योगेश मचाले, मिनीनाथ गव्हाणे, दिगंबर शेंडकर व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर अक्षय पाटील (रा. तळेगाव ढमढेरे) यांच्या फिर्यादीनुसार अमोल चौगुले, राहुल गिरे व संदीप तेलंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली असली तरी या प्रकरणातील वापरलेले शस्त्र अद्याप जप्त करण्यात आलेले नाही. मात्र, दिवसभरात एकूण किती संशयितांना ताब्यात घेतले याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.