आळंदी, ता. १७ : दर्शनावेळी चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडू नये यासाठी आळंदीतील कार्तिकी वारीच्या दर्शनबारीचे इंद्रायणीकाठी शिक्षण संस्थेची खासगी जागा अधिग्रहण करण्याचा आदेश हवेली प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी काढला आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणून हा आदेश काढण्यात आला असून सोमवार (ता. २०) ते शनिवार (ता. ३०) या काळात ही जागा अधिग्रहीत केली जाणार आहे. यामुळे सुमारे अठ्ठेचाळीस गुंठे जागेत तात्पुरत्या स्वरूपात दर्शन मंडप उभारणे देवस्थानसाठी सुलभ आणि सोयीचे झाले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिननिमित्त आळंदीत चार ते पाच लाख वारकरी कार्तिकी वारीत आळंदीत सहभागी होतात. शनिवार (ता. २३) ते १ डिसेंबरपर्यंत कार्तिकी वारी सोहळा आहे. या वारीसाठी राज्यभरातून अनेक दिंड्या, लाखो वारकरी आळंदीत चारपाच दिवस आधीपासून येतात. वारकरी इंद्रायणी स्नान, माउलींचे समाधी दर्शन, नगरप्रदक्षिणा असा नित्यनेम करतात. येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एकाच ठिकाणी शहरात दर्शनबारीसाठी मोठी आणि सुसज्ज जागा उपलब्ध नाही. यामुळे काही वर्षे शिक्षणसम्राट डॉ. विश्वनाथ कराड यांच्या इंद्रायणी काठच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात जागेचे अधिगृहण करून दर्शनमंडप उभा केला जातो. यंदाच्या वर्षीही डॉ. माने यांनी जमीन अधिग्रहणाचा आदेश काढला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ही जमीन तात्पुरत्या मंडपासाठी अधिग्रहण केली जात असल्याचे आदेशात म्हटले आहे. याबाबतची मागणी आळंदी नगरपरिषद, दिघी पोलिस ठाणे आणि अप्पर तहसीलदार पिंपरी चिंचवड यांनी लेखी स्वरूपात केली होती.
याबाबत आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर म्हणाले, ‘‘आळंदीमध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी येतात. त्यांच्या सोयीसाठी इंद्रायणीकाठी सुयोग्य जागा असल्याने पोलिस आणि महसूल प्रशासनाने अठ्ठेचाळीस गुंठे जागा अधिग्रहीत करून दर्शन मंडप उभारण्यासाठी दिली आहे. सध्या देवस्थानकडून या जागेत मंडप उभारण्याचे काम सुरू असून दोन ते तीन दिवसांत संपूर्ण दर्शनमंडपाचे काम पूर्ण होईल. वारकऱ्यांना पुणे-आळंदी रस्त्याने येताना हा मंडप लागेल. रस्ता आणि नदीच्या बाजूने काहीशी मोकळी जागा असल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. हे लक्षात घेता प्रशासनाने ही जागा ठरविली आहे.
दर्शनमंडपातील सुविधा
- विद्युत व्यवस्था
- पिण्याचे पाणी
- स्तनपानासाठी हिरकणी कक्ष
- आपत्कालीन मदतीसाठी कक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.