आळंदी, ता. १ : ‘‘मानवाचा विचार अधःपतित होणे संतांना अपेक्षित नाही. ज्ञान, भक्ती आणि कर्म या तीन साधन कर्मयोगातील दोष कृतीने न काढता विचारानेच काढला जातो. कर्माचा आंतरिक त्याग विचाराने केला जातो आणि मग फलासक्ती येते. देवाने माणसाला दिलेली सर्वोत्तम भेट ‘बुद्धी’. मनुष्य विचाराने समाधानी होईल, समाजातील प्रत्येक जीव हा विचारशील आणि विचारसंपन्न असावा अशी माउलींची पसायदानात मागणी आहे. पसायदान ही मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. मानवाच्या मनाचा संबंध पसायदानातील प्रत्येक ओवीमध्ये जोडण्यात आला आहे. सत्वशिलतेची जाणीव संत ज्ञानेश्वर महाराज सदैव करून देतात.’’ असे प्रतिपादन चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आळंदीत केले.
संत ज्ञानेश्वर माउलींचा ७५० वा जन्मोत्सव आणि प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्यानिमित्त आयोजित पारायण सोहळ्यात पसायदानावर प्रवचन करताना देगलूरकर महाराज बोलत होते.
देगलूरकर महाराज म्हणाले, ‘‘ज्ञान आणि योग यामध्ये अनेक दोष आहेत. परमार्थात साधनमार्गात प्रामाणिक आणि अप्रामाणिक असे दोन दोष येतात. काही प्रतिकूल म्हणून येतात, काही अनुकूलतेचे रूप धारण करतात. मनुष्य दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा त्याच्या अंत:करणात दुष्कर्माची जाणीव असते. अंत:करण हे सात्त्विक असते. विपरीत विचार आणि दुर्बल विचार स्वतंत्र संकल्पना आहेत. बुद्धी कलुषित झाल्यावर अधर्म धर्म वाढू लागतो आणि अनीती नीती वाढू लागते. विषयाचा उपभोग घेणे हेच जीवनाचे ध्येय आणि धन्यता असल्याचे वाटू लागते. तेव्हा मनुष्य वाटेल ते करू लागतो. मग विनाश ठरलेलाच असतो. मानवी मनातील हेच विपरीत बीज नष्ट होणे गरजेचे असल्याचे माउलींचे म्हणणे आहे.’’
‘‘सत्कर्म वाढले पाहिजे आणि त्यामध्ये आवड असली पाहिजे. कर्म ही माणसाची गरज आहे. मात्र अगतिक आणि औपचारिक कर्म असू नये. औपचारिक कर्म समाजपरिवर्तनाचे माध्यम नाही. त्याने वृत्ती परिवर्तनही होत नाही. अगतिकतेनेही सत्कर्म परिवर्तन होत नसते, गरज आणि आवड वेगळी असते. आवडीला व्यभिचार चालत नाही आणि गरज व्यभिचारी असते. सत्कर्म हे नेहमी आवडीने करावे. सत्कर्मातील आवड वाढती असावी. सत्कर्मातील आवड वाढली की स्वकल्याणापेक्षा परकल्याणाकडे कर्म झुकते.’’
‘‘विश्वामध्ये जिवांचे मैत्र निर्माण होण्यासाठी वृत्तीपरिवर्तनाचा विचार झाला पाहिजे. यात समाज आणि मानसशास्त्र ज्ञानोबारायांनी मांडले आहे. सत्क्रिया अंत:करणातील द्वेष काढून एकमेकांचे हित साधते. मोठी माणसे नेहमी समाजाचा विचार करतात. भूतमात्रांबद्दल संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे. मनुष्यामध्ये सहानुभूती आणि समानानूभूती निर्माण झाली पाहिजे. हेच जिवाभावाचे मैत्रेय असून हा सामाजिक परिणाम असल्याचे पसायदानातून ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. अंधकार हा विपरीत रुपाचा प्रकाश आहे. स्वधर्माच्या सूर्याशिवाय अंध:कार नष्ट होणार नाही.’’
विचार आणि आचारांचा समन्वय असावा
बुद्धीचे मैत्री करुणा उपेक्षा आणि मुर्तता असे चार प्रकार आहेत. पापापासून निवृत्त करणाऱ्या भावना आणि सकारात्मक भावना ज्या पुण्याकडे प्रवृत्त होतात अशा बुद्धीचे परिणाम आहेत. विचार आणि आचारांचा समन्वय असावा. कर्माला ज्ञानाचे डोळे जे ज्ञान कृतीतून व्यक्त होत नाहीत ते ज्ञान काय उपयोगाचे. यापेक्षा जीवाचा सत्कर्म वाढला पाहिजे असे ज्ञानेश्वर महाराज सांगत असल्याचे देगलूरकर यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.