आळंदी, ता. १ : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांच्या पिकअप वाहनाचा आळंदी- मरकळ रस्त्यावरील मरकळ येथील रबीन केबल कंपनीसमोर गुरुवारी (ता. १) सकाळी दहा वाजून ४० मिनिटांनी झालेल्या अपघातात कुरुळी (ता. खेड), पिंपरी चिंचवड आणि नांदेड भागातील सुमारे ३२ अनुयायी जखमी झाले. त्यात कुरुळी येथील दीड वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. सर्व जखमींवर आळंदीतील ग्रामीण रुग्णालय, पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय आणि आळंदीतील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहे.
याबाबत आळंदी पोलिसांनी माहिती दिली की, विजयस्तंभाला भेट देण्यासाठी आणि मानवंदना करण्यासाठी अनेक अनुयायी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जात असतात. कुरुळी येथील सोनवणे वस्तीवर नांदेड येथील एक कुटुंब स्थायिक झालेले आहे. त्यांनी त्यांचे अन्य नातेवाईक एकत्र करून पेरणे फाटा येथे पिकअप वाहनाने (क्र. एम.एच. १४ एल.बी. ३०९७) चालले होते. जवळपास ३० ते ३५ जण या एका वाहनामध्ये होते. गाडीच्या बाजूला आणि मध्यभागी लाकडी फाळके लावले होते आणि त्यावर लोक बसले होते. मरकळ येथे आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहनाने झोला मारला. त्यात वाहन उलटले. या अपघातामध्ये २८जण किरकोळ जखमी झाले, तर तीन ते चार जणांना फ्रॅक्चर झाले.
अपघातस्थळी महिला तसेच लहान मुलाचा रडण्याचा आवाज मोठ्याने येत होता. तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी सहकार्य करत आळंदी पोलिसांना माहिती कळवली व रुग्णवाहिका बोलावली. तीन ते चार रुग्णवाहिकांच्या माध्यमातून काही खाजगी वाहनातून जखमींना आळंदीतील ग्रामीण रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी रुग्णांवर तातडीचे इलाज केले. चार ते पाच जणांना फ्रॅक्चर झाले, तर चार जणांना डोक्याला मार लागलेला होता. एकाच्या आतड्यांना मार लागला होता. अशा दहा जणांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले. इतर रुग्ण आळंदीतील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.
आळंदीतील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उर्मिला शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील प्रशांत आनंद पवार, गोदावरी दिगंबर वाघमारे, रावसाहेब लक्ष्मण गवांदे, शालिनी कांबळे; तर लोहा येथील अनिल नारायण सुंडे, कुरुळीमधील प्रेम प्रमोद कांबळे, रत्नदीप गोविंद सावरे, गोविंद सावरे, नंदिनी विश्वनाथ पगारे, सुलोचना सोनुले, करुणा प्रभाकर सोनुले, चैतन्य अनिल धुंडे, अनुराधा धुंडे, यवतमाळ येथील वंदना सिद्धार्थ खाडे, पिंपरी चिंचवडमधील प्रभाकर सोनुले, तेलंगणा येथील दिनेश कांबळे, यांना आळंदीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यामध्ये चैतन्य धोंडे हा कुरळीतील दीड वर्षाचा मुलगा आहे, तो जखमी झाला आहे.