आळंदी, ता. २४ : येथील अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेची बनावट कागदपत्रांच्या आधारावर बनावट कर्जदार उभे करून त्यांना सोनेतारण कर्ज देत ११ कोटी ३ लाख १३ हजार ३८० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी (ता. २३) रात्री गुन्हा दाखल केल आहे. त्यामध्ये पतसंस्थेचा व्यवस्थापक सचिव बाळू अर्जुन पवार (रा. पगडे वस्ती- चऱ्होली खुर्द), पतसंस्थेचा ऑडिटर संजय मोहन लांडगे (रा. हडपसर, पुणे) आणि सोनार पूर्णानंद अरविंद खोल्लम (वय ५२, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली), या तिघांचा समावेश आहे.
ही आर्थिक अपहाराची घटना २४ नोव्हेंबरपूर्वी आळंदी येथील अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या ठिकाणी घडली. याबाबत फिर्याद पतसंस्थेचे संचालक संजय जयसिंग शिर्के (वय ५८, रा. आळंदी देवाची) यांनी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये दिली. त्यानुसार, अमृतानुभव पतसंस्था आळंदी शहरातील सर्वात जुनी असून, चावडी चौक येथे त्याचे कार्यालय आहे. मागील काही महिन्यांपासून पतसंस्थेत अपहार झाल्याची चर्चा पतसंस्थेचे गुंतवणूकदार करत होते. तसेच, जमा केलेले पैसे पतसंस्थेकडे मागण्यासाठी गुंतवणूकदार सतत कार्यालयात ये-जा करत होते. दरम्यान, २४ नोव्हेंबरपूर्वी संचालक मंडळाने पतसंस्थेच्या व्यवस्थापक तथा सचिव म्हणून बाळू अर्जुन पवार यांची निवड करून पतसंस्थेच्या सर्व कारभाराबाबतचे अधिकार सोपवले होते. त्या अधिकाराचा गैरवापर करून बाळू पवार आणि पतसंस्थेत नेमणूक केलेला ऑडिटर संजय लांडगे, सोनार पूर्णानंद खोल्लम या तिघांनी आपसामध्ये संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याच्या आधाराने बनावट कर्जदार उभे करून त्यांना सोने तारण कर्ज देऊन कर्जाची रक्कम परस्पर स्वतःकडे काढून घेतली. तसेच, खोटे अहवाल देऊन सोनार व ऑडिटर यांनी सभासद आणि संचालक मंडळांचा विश्वासघात केला. बाळू पवार याने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज दिल्याचे भासवून कर्जाची रक्कम परस्पर काढून पतसंस्थेच्या ११ कोटी ३ लाख १३ हजार ३८० रुपयांचा अपहार केला. या अपहारप्रकरणी अखेर संचालक मंडळांनी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी होऊन शुक्रवारी (ता. २३) रात्री आळंदी पोलीस ठाण्यामध्ये पवार, लांडगे आणि खोल्लम या तिघांवर गुन्हा दाखल केला.
कुंपणानेच शेत खाल्ले
आळंदीतील अमृता अनुभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित व्यवस्थापकाने केलेल्या अपहाराबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘सकाळ’ने १२ आणि ३० डिसेंबरला प्रसिद्ध केले होते. त्यामुळे गुंतवणूकदार ठेवीदार आणि संचालक मंडळाने दखल घेत तत्काळ तक्रार दाखल केली. पतसंस्थेच्या पैशांबरोबरच काही ठेवीदारांना पतसंस्थेत पैसे न ठेवता माझ्याकडे द्या, असे सांगूनही पवार यांनी लाखो रुपयांची रक्कम लाटली असल्याची चर्चा काही गुंतवणूकदारांमध्ये सुरू आहे. संचालकांनी विश्वासाने पवार याच्यावर सर्वाधिकार सोपवले. मात्र, पवार याच्या या कृत्याने सर्वांच्या विश्वासात तडा गेला. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार या पतसंस्थेच्या व्यवस्थापक ऑडिटर आणि सोनाराच्या गैरकृत्याने उघड झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.