आळंदी, ता. ११ : ग्रामीण भागात निवडणूक जनजीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो. निवडणुकीची चर्चा उमेदवाराचा विजय असो वा पराभव, दोन्ही बाजूने होते. खेड तालुक्यात आता आनंदाचा जल्लोषाचा तसेच दुःखाचा प्रसंगही ढाब्यांवर आणि मद्यगृहांमध्ये जाऊन साजरा केला जात असून समर्थकांची सुख-दुःखात दोन्ही बाजूने चंगळ आहे.
निकालानंतर खेड तालुक्यात बहुतांश ढाब्यावर मद्यगृहांवर गर्दी पाहायला मिळाली. ज्यांच्याकडे परवाना नाही; मात्र चोरून अवैध दारू विक्री करतात अशा हॉटेलवरही रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. निमित्त एकच होते विजयाचा जल्लोष आणि पराभवाचे शल्य पचवणे. यावर उतारा म्हणजे ढाब्यावरचे जेवण आणि दारू. एवढे पैसे खर्च झाले मतदान कुठे गेले यावरच चर्चा ठिकठिकाणी रंगू लागल्या होत्या.
खेड तालुका हा शेतीने समृद्ध, औद्योगिक भागाने विस्तारलेला आणि नाशिक अहिल्यानगर मुंबई महामार्गालगतचा परिसर असल्याने याठिकाणी अन्य जिल्ह्यातील तसेच राज्यातून स्थलांतरित होऊन स्थायिक झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये कामगारवर्ग, भाडेकरू अशा मतदारांची संख्या जादा असल्याने खेडच्या पूर्व आणि दक्षिण पट्ट्यातील उमेदवारांना खर्च करताना दमछाक झाली. दोन्ही बाजूने देवदर्शनाच्या सहली वर्षभर होत्या. एका उमेदवाराने चांदीची बिस्किटे वाटल्याची चर्चा होती. तर साड्या, अन्नपदार्थ, जेवणावळी वेगळ्याच. मतांची किंमत आणि खर्च पाहता पुढील वेळी निवडणूक लढविताना भावी उमेदवारांना आधी खिशाचा विचार करावा लागणार आहे. ज्याच्या खिशात पैसा त्यानेच निवडणूक लढवावी. ‘भाऊ अजितदादा म्हणाले तेच खरे होते’. ‘राजकारण नको रे बाबा’, ‘जमिनी विकून राजकारण नका करू’ हे आताच्या निवडणुका पाहून नागरिक चर्चा करू लागले आहेत.
भावी आमदारांना मतदारांनी दाखविली ‘जागा’
यंदाच्या निवडणुकीत भावी आमदारांना मात्र मतदारांनी जागा दाखविली. आम्हाला गृहित धरू नका, असा संदेश जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत अप्रत्यक्ष दिला गेला. ज्यांना चार-पाच हजार मतांनी निवडून जाऊ असे वाटले अशा धनिक उमेदवार अवघ्या पंधराशे ते अठराशे मतांनी जिल्हा परिषदेत निवडून आले. तर पंचायत समितीचे उमेदवार तर बहुतांश ठिकाणी ३०० ते ५०० च्या आतील फरकाने आल्याने निवडणूक सोपी नसल्याचे चित्र चर्चिले जाऊ लागले.
आमदार काळेंचे नेतृत्व प्रभावी
तालुक्यातील निवडणूक माजी आमदार दिलीप मोहिते विरुद्ध अन्य पक्षांचे पदाधिकारी आणि आमदार बाबाजी काळे अशीच होती. राष्ट्रवादीला अवघ्या तीनच जागा मिळाल्या. तर शिवसेना, भाजपला एकही जागा मिळाली नाही. तुलनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ५ जागा मिळाल्या. मोहितेविरोधी गटाने जरी सरशी मिळवली असली तर भावी आमदार असलेले शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनिता बुट्टे पाटील, विजयसिंह शिंदे यांच्या विजयाचा फरक पाहिला तर आगामी काळात त्यांना आणखी बांधणी कार्यकर्त्यांच्या रूपाने करावी लागणार आहे. तर अतुल देशमुख तर मागे पडले आहेत. यामुळे जरी मोहिते विरोधकांना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व मिळाले असले तरी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला हरविण्यासाठी आगामी काळात तगडी मोर्चे बांधणी करावी लागणार असल्याची चर्चा होती.
माजी आमदार मोहितेंच्या विरोधात आणखी प्रबळ विरोधक
माजी आमदार दिलीप मोहिते आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे जावई सुधीर मुंगसे (उद्योजक) यांच्यात राजकीय वैर कायम असल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. शरद बुट्टे पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यानंतर मोहिते यांनी मुंगसे यांना मात्र प्रवेश देऊ नये अशीच भूमिका घेतली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंगसे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पत्नी विनया मुंगसे यांना उभे करत निवडणूक लढविली. विनया मुंगसे आणि पिंपळगावतर्फे खेड गटातील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विजयसिंह शिंदे यांच्या विजयाने माजी आमदार मोहिते यांच्या विरोधात पूर्व भागातून आणखी प्रबळ विरोधक तयार झाल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.