आळंदी, ता. १६ : चऱ्होली खुर्द येथील कचरा डेपोला महिनाभरापूर्वी लागलेली आग अद्याप धुमसत असताना ग्रामपंचायतीकडून त्याच ठिकाणी पुन्हा नवा कचरा टाकला जात आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून, आसपासच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे.
चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळ हा अनधिकृत कचरा डेपो उभारण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणण्याऐवजी, प्रशासन दररोजचा कचरा त्याच पेटत्या ढिगाऱ्यावर टाकत आहे. वाऱ्यामुळे हा धूर वृद्धाश्रमातील महिलांच्या निवासापर्यंत पोहोचत असल्याने त्यांच्यासह आसपासच्या परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या गंभीर प्रदूषणामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रात्रीच्या वेळी काही कारखान्यातील कचरा टाकला जात आहे. पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण जळालेला कचरा स्वतंत्र मोठा खड्डा घेऊन जमा केला जाईल. नवीन कचरा वेगळ्या जागेमध्ये ठेवला जाईल. ग्रामपंचायतीचा कचरा आळंदी नगरपरिषद कचरा डेपोमध्ये वर्गीकरण करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्यासोबत बैठक होईल. ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने कचरा वर्गीकरण करण्यासाठी यंत्रसामग्री विकत घेणे शक्य होत नाही.
- बाळासाहेब बिंदले, ग्रामविकास अधिकारी, चऱ्होली खुर्द (ता. खेड)
महत्त्वाचे मुद्दे
दररोज दीड टन कचरा जमा
ग्रामपंचायतीच्या चार घंटागाड्या, सोसायटीच्या दोन ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन
ओला व सुका कचरा वर्गीकरणाचा अभाव
ग्रामपंचायत हद्दीतील सात ठिकाणचा रस्त्यावरचा कचरा उचलण्यासाठी कंत्राट देण्यात आले असून, महिन्याला सुमारे दीड लाख रुपये खर्च अपेक्षित
7206