आळंदी, ता. ३ : मार्चअखेरची करवसुली महत्त्वाची असतानाही कार्यालयात उशिरा येणाऱ्या ३० कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सोमवारी (ता. २) गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी केलेल्या या अनोख्या ''गांधीगिरी''मुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, यापुढे कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आळंदी नगरपरिषदेची करवसुली सध्या ५० टक्क्यांवर आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक असतानाही अनेक अधिकारी व कर्मचारी उशिरा येत असल्याचे निदर्शनास आले होते. वारंवार सूचना देऊनही फरक पडत नसल्याने आज मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः प्रवेशद्वारावर थांबून उशिरा येणाऱ्या ३० कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प दिले आणि वेळेचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये कायमस्वरूपी, रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. "केवळ बोलून फरक पडत नसेल, तर सकारात्मक संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यालयीन शिस्त पाळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे," असे मुख्याधिकारी खांडेकर यांनी स्पष्ट केले.
बायोमेट्रिक बंद असल्याने फावतेय
अनेक कर्मचारी ११ नंतर नगरपरिषद कार्यालयात येतात. काही सायंकाळी पाचच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडण्याऐवजी अगोदरच बाहेर पडतात. नगरपरिषदेची बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद असल्याने आणि हालचाल रजिस्टर उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांचे फावत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
7326