आळंदी, ता. ५ : संत ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा हे ग्रंथ नसून केवळ भाष्य आणि संकलन असल्याचे विधान करणाऱ्या स्वामी गोविंददेव गिरी यांचा आळंदी देवस्थानने पत्राद्वारे जाहीर निषेध केला आहे. स्वामींनी संतांच्या वाङ्मयाचा अवमान केला असून त्यांनी सकल संतांची क्षमा मागावी, अशी मागणी देवस्थानने केली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी ''दासबोध'' हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असल्याचे विधान केले होते. या विधानाचे वारकरी संप्रदायात तीव्र पडसाद उमटले आहेत. आळंदी देवस्थानने गुरुवारी (ता. ५) सकाळी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रात म्हटले आहे की, संत ज्ञानेश्वरांनी ''ज्ञानेश्वरी'' हा अलौकिक ग्रंथ प्राकृत भाषेत निर्माण केला आहे. स्वतः माऊलींनी आणि संत नामदेवांनी या ग्रंथाचे मोठेपण स्पष्ट केले आहे. असे असताना स्वामींनी त्याचे वर्णन केवळ ''भाष्य'' असे करणे चुकीचे आहे. संत नामदेव, संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वाङ्मय हे जगाच्या कल्याणाचे अमृतपान आहे. स्वामी गोविंददेव गिरी यांच्या विधानाशी संस्थान कमिटी पूर्णतः असहमत असून, माउलींनी त्यांना सद्बुद्धी द्यावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. या निषेध पत्रावर प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजन नाथ, चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार आणि पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.