आळंदी, ता. २९ : आळंदी नगरपरिषद हद्दीत मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, गेल्या पाच दिवसांत तब्बल ३५ नागरिकांना चावा घेतला आहे. यामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील संत ज्ञानेश्वर माउली मंदिर परिसर, भागीरथी नाला, मरकळ रस्ता आणि चाकण चौक भागात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. सोमवारी (ता. २३) ६, मंगळवारी ५, बुधवारी १३, गुरुवारी ५ आणि शुक्रवारी ६ अशा एकूण ३५ जणांना कुत्र्यांनी जखमी केले. जखमींमध्ये सुनील काकडे, केशव भोर, कृष्णा जाधव, स्वाती नरके यांच्यासह अन्य नागरिकांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयाकडून मिळालेल्या आकडेवारीमुळे या समस्येची तीव्रता समोर आली आहे.
भाजी मंडई आणि शाळांच्या परिसरात कुत्र्यांची टोळकी असल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. चाकणमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही आळंदी नगरपरिषद उदासीन असल्याचे चित्र आहे. सिद्धबेट येथे कुत्र्यांसाठी उभारलेली शेड अद्याप रिकामीच असून, प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
शहरात कुत्र्यांच्या चाव्याचे प्रमाण वाढले आहे. लहान मुले विशेषतः वारकरी विद्यार्थी, कामावरून येणाऱ्या महिला व पुरुष यांनाही कुत्रा चावण्याचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तसेच रेबीजचे इंजेक्शन देऊन रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र अशा रुग्णांनी काही दिवस स्वतःवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
- डॉ. उर्मिला शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, आळंदी ग्रामीण रुग्णालय
महिना... चावा घेतलेल्यांची संख्या
डिसेंबर : १३८
जानेवारी : २११
फेब्रुवारी : २०८