आळेफाटा, ता. ३१ : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आळे (ता. जुन्नर) येथील रेडा समाधी मंदिराच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे रविवारी (ता. ४) प्रस्थान होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश कुऱ्हाडे, पायी वारी पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, व्यवस्थापक कान्हू कुऱ्हाडे यांनी दिली.
वेद बोलविलेल्या रेडा समाधी मंदिराचा श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचा हा पायीवारी पालखी सोहळा १८ वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज समाधी सोहळ्यातील यात्रा महोत्सवात नियमितपणे सहभागी होत आहे. यावर्षीही रविवारी रेडा समाधी मंदिरातून या पालखी सोहळ्याचे विधिवत प्रस्थान होणार आहे. या पायी वारी पालखी सोहळ्याचा मार्ग संतवाडी, बेलापूर, कोतुळ, राजूर, वारंघुशी, टाकेद, घोटी व वांजळे असा असून, विविध ठिकाणी मुक्काम करत हा सोहळा सोमवारी (ता. १२ जानेवारी) त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संदीप पाडेकर, सचिव जीवन शिंदे, पायी वारी समितीचे उपाध्यक्ष नागेश कुऱ्हाडे, भागाजी शेळके, सखाराम कुऱ्हाडे यांनी दिली.