पारगाव, ता. ७ : ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात भंडारा खोबरे उधळून हजारो भाविकांनी शनिवारी चंपाषष्ठीनिमित्त धामणी (ता. आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.
लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात शनिवारी चंपाषष्ठीच्या पहाटे चार वाजता खंडोबाच्या मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक चंपाषष्ठी उत्सव मंडळाचे मच्छिंद्र वाघ, सेवेकरी तांबे, भगत यांनी केला. त्यानंतर स्वयंभू सप्तशिवलिंगावर पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच म्हाळसाई, बाणाई, जोगेश्वरीच्या मूर्तींना वस्त्रालंकार करण्यात आला.
पहाटे पाच वाजता सेवेकरी धोंडीबा भगत, दादाभाऊ भगत, सुभाष तांबे, प्रभाकर भगत, शांताराम भगत, राजेश भगत, राहुल भगत, नामदेव भगत, ज्ञानेश्वर जाधव, सीताराम जाधव, देवानंद जाधव, दिनेश जाधव, नामदेव पवार, सुरेश पवार यांनी विधीवत पूजा करून महाआरती केली. त्यानंतर दर्शन घेण्यासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. पहाटे दर्शनासाठी महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी धामणी, लोणी, खडकवाडी, गावडेवाडी, महाळुंगे पडवळ, तळेगाव ढमढेरे, अवसरी खुर्द, संविदणे येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणे, मुंबई, भोसरी, पिंपरी चिंचवड शहरातील व परिसरातील भाविक सकाळपासून दर्शनाला येत होते. मंदिराच्या शिखरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिराच्या आवारात भाविकांची नवसाची पाचनामाची जागरणे सुरु होती. भंडारा, खोबरे उधळून सदानंदाचा येळकोटचा गजर करत तळीभंडारा करत होते.
सकाळी नऊ वाजता प्रणिती महाराज यादव आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठी उत्सव मंडळाच्या वतीने लापशी व वांग्याच्या रस्सा भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी एक वाजेपर्यंत चार हजारांहून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.