पारगाव, ता. १० : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गजबजलेल्या भरवस्तीतील गावठाण परिसर व बाजारपेठमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील सर्वच गावात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पाळीव कुत्रे, गोठ्यातील जनावरे, शेळ्या मेंढ्या यांच्यावरील बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. गावठाणातील पाळीव कुत्रे मोठ्या प्रमाणात बिबट्याच्या भक्षस्थानी पडत आहे. बुधवारी (ता. १०) पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास अवसरी बुद्रुक बाजारपेठेतील कुंभारवाड्याच्या बाजूला राहणाऱ्या श्रीधर मंडलिक यांच्या घराजवळ असलेल्या सीसीटीव्ही बिबट्याचे चित्रीकरण झाले आहे.