पारगाव, ता.२२ : उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे ब्रॉयलर कोंबड्यांच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. जिवंत कोंबड्यांचे दर प्रतिकिलो १५० रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून तोट्यात असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंबेगाव तालुक्यासह जिल्ह्यात चिकनचे किरकोळ दरही २८० रुपयांपर्यंत वधारले आहेत.
मागील काही वर्षांपासून उत्पादन खर्च वाढल्याने आणि मागणी घटल्याने पोल्ट्री उद्योग मंदीत होता. मात्र, सध्या उष्णतेमुळे कोंबड्यांची वाढ खुंटल्याने बाजारात पुरवठा कमी पडत आहे. दीड महिन्यापूर्वी १२० रुपयांवर असलेले जिवंत कोंबड्यांचे दर आता १४५ ते १५० रुपयांवर गेले आहेत. उत्पादन खर्च १०० ते १०५ रुपये असल्याने व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. चिकन विक्रेते बाबू मणियार यांनी सांगितले की, किरकोळ बाजारात चिकनचे दर २०० रुपयांवरून २८० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांतील मंदीमुळे अनेकांनी व्यवसाय बंद केला होता. सध्या रमजान ईद आणि उन्हाळ्यामुळे मागणी वाढली. मात्र पुरवठा कमी आहे. त्यामुळे हे उच्चांकी दर उन्हाळा संपेपर्यंत टिकून राहतील.
- डॉ. प्रसन्न पेडगावकर, महाव्यवस्थापक, वेकिंज
उन्हाळा असूनही मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचा मागील दोन-तीन वर्षांचा तोटा भरून निघण्यास मदत होत आहे. हा बदल व्यवसायासाठी आश्वासक आहे.
- प्रमोद हिंगे, संस्थापक-संचालक, ऊर्जा फुड्स, मंचर, (ता. आंबेगाव)
06776