आपटाळे, ता. २१ : ‘‘जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजाराच्या विस्तारीकरणासाठी नारायणगाव- मांजरवाडी रस्त्यालगतची जमीन ही शेतकऱ्यांच्या हितासाठी व बाजार समितीच्या विकासासाठी शासनाचे सर्व नियम पाळूनच खरेदी केलेली आहे. विरोधकांकडून केवळ संस्थेची व संचालकांची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू असून, त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे,’’ असे बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे यांनी सांगितले.
जुन्नर बाजार समितीने गत आठवड्यात नारायणगाव- मांजरवाडी या रस्त्यालगत प्रतिगुंठा ७ लाख ११ हजार रुपये दराने १० एकर क्षेत्र २८ कोटी ४४ लाख रुपयांना खरेदी केले. मात्र, ही जागा महागडी असून, या व्यवहाराने बाजार समितीचे व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, संतोष चव्हाण, प्रियांका शेळके, भास्कर घाडगे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. काळे यांनी नारायणगाव येथे बाजार समितीच्या आवारात आयोजित पत्रकार परिषदेत खुलासा केला.
ते म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या सर्वच उपबाजारातील जागा कमी पडत आहेत. बाजार समितीच्या विकासासाठी, शेतकऱ्यांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी व प्रक्रिया उद्योगांची उभारणी करण्यासाठी जागांची आवश्यकता असल्याने सन २०२०पासून बाजार समितीच्या विस्तारीकरणासाठी जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा व बेल्हे या उपबाजारासाठी जागा खरेदी करण्याचा विषय सुरू होता. बाजार समितीच्या वेळोवेळी झालेल्या सभांमध्ये त्याला उपस्थित सर्व संचालकांनी संमती दर्शवली होती. जागा खरेदी करण्याबाबत जाहीर निविदा दिली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया पार पडली. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून पणन संचालकांकडे खरेदी परवानगीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यास त्यांनी मंजुरी दिली. या मंजुरीला स्थगिती देण्यासाठी काही संचालकांनी पणन संचालकांकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्यानुसार पणन संचालकांनी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना दिले. त्यानुसार सहाय्यक निबंधक यांनी चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला व त्यानुसार पणन संचालक यांनी जागा खरेदी करण्यासाठी रीतसर परवानगी दिली. त्यामुळे शासनाचे सर्व नियम पाळूनच हा व्यवहार केला आहे.’’
आरोप करणाऱ्या संचालकांपैकी काहींचा अन्य जागा घेण्यासाठी आग्रह होता. त्या जागेची देखील संचालक मंडळाने पाहणी केली. ती जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य नव्हती. तसेच जागा मालकाने १२ लाख रुपये प्रति गुंठा एवढा बाजारभाव सांगितल्याने ती जागा घेण्याचे टाळले. त्यामुळे विरोध करणाऱ्या संचालकांचे हित दुखावले गेल्याने विरोधक बिनबुडाचे व तथ्यहीन आरोप करत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून संस्था व संचालकांची नाहक बदनामी करत आहेत. केवळ राजकीय आकसापोटी व स्वार्थापोटी आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये.
- ॲड. संजय काळे, अध्यक्ष, जुन्नर बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.