आपटाळे, ता. १९ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील इच्छुकांची विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यातच ग्रामीण भागात असलेल्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात या इच्छुकांची हजेरी वाढू लागल्याने भाषणासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे त्यातच भाषणांची संख्या वाढू लागल्याने उपस्थितांना मात्र या भाषणामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. तर भाषणांची संख्या वाढल्याने दशक्रिया विधी कार्यक्रमाचा वेळ लांबणीवर पडत असल्याची खंत देखील व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीची गट व गण रचना जाहीर झाली. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या. सर्वांच्या नजरा गट व गणाच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. त्यातच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील बारव पाडळी व सावरगाव कुसूर या दोन गटांमध्ये ‘थोडी खुशी थोडा गम’ अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली. बारव पाडळी गण व गटांमध्ये महिलाराज आल्याने प्रबळ इच्छुक पुरुष कार्यकर्त्यांची मात्र घोर निराशा झाली आहे. तर या नेतेमंडळीकडून घरातील महिला उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. या महिला उमेदवारांना देखील आता या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावावी लागत असल्याचे चित्र आहे. तर सावरगाव कुसूर हा गट व गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आल्याने या गटातून आणि गणातून इच्छुकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर दिवाळीनंतर आचारसंहिता लागून निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने इच्छुकांनी गटातील प्रत्येक गावातील कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटा लावला आहे.दशक्रिया विधीमध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक असल्याने प्रत्येक दशक्रियेत भाषण करण्याची संधी मिळावी यासाठी इच्छुकांकडून आटापिटा सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे काही ठिकाणी भाषण करणाऱ्यांची संख्या १० ते १५ पेक्षा जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच एखाद्याला भाषणाला संधी मिळालीच तर गावासाठी, युवकांसाठी आजपर्यंत काय केले, यापुढे काय करणार याचा पाढा वाचून उपस्थितांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या इच्छुकांची अपेक्षा पूर्ण करताना आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नागरिकांची मानसिकता ओळखण्याची आवश्यकता
या इच्छुकांची अपेक्षा पूर्ण करताना आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच एखाद्या इच्छुकाला भाषणाची संधी मिळाली नाही तर आयोजकांना त्याच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे देखील पाहावयास मिळत आहे. यापुढील काळात देखील निवडणुका होईपर्यंत मात्र मतदारांना सुद्धा अशा नानाविध अनुभवांना सामोरे जावे लागणार आहे तर इच्छुकांनी देखील पुढे कशासाठी व कोणत्या कार्यक्रमासाठी बसलेल्या नागरिकांची मानसिकता ओळखण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.