जुन्नर, ता. १२ : जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मानव-बिबट संघर्ष तीव्र झाला आहे. तालुक्यासोबतच शेजारील आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यात देखील बिबट्याच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सध्या रब्बी हंगामाच्या पिकांच्या लागवडीची कामे वेगात सुरू आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांचा ठिबक सिंचनाकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.
जुन्नर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून लहान मुलांपासून युवक, महिलांपर्यंत हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रात्री-अपरात्री दिसणारा बिबट्या आता तर थेट दिवसाढवळ्या शेतांच्या बांधावरून, काही ठिकाणी शेतामध्ये तळ ठोकून बसत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात बागायती शेतीचे प्रमाण अधिक आहे. सद्यस्थितीमध्ये रब्बी हंगामाच्या पिकांची लागवड सुरू आहे. पाच धरणे, लघु पाटबंधारे, विहिरी यांची संख्या अधिक असल्यामुळे पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेतकरी पिकाची लागवड झाल्यानंतर बहुतांशी शेतकरी पाट पद्धतीने पाणी भरतो. विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्याला कधी रात्रीही पिकाला पाणी द्यावे लागते. पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी समूहाने न जाता एकटाच पाणी देतात. मात्र सध्या बिबट्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे रात्री-अपरात्री एकट्याने पिकाला पाणी देणे भीतीदायक ठरू लागल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर वाढवल्याचे दिसून येत आहे. तर काही शेतकऱ्यांनी ठिबक सोबतच विहीर अथवा सिंचनाच्या सुविधेवर मोबाईलद्वारे मोटार सुरू करण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जरी पिकाला पाणी देण्याची गरज भासल्यास मोबाईलद्वारे मोटार चालू करता येते आणि थेट शेतावर जाण्याची या शेतकऱ्यांना गरज भासत नाही. दरम्यान, बिबट्याची वाढलेली संख्या व मानवावर होत असलेल्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. कधी समोरून बिबट्या येईल आणि हल्ला करेल याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांना शेतात जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दिवसाढवळ्या बिबट्या शेतात फिरत आहे. पिकाला पाणी देण्यासाठी एकट्याने आता शेतावर जाणे हे भीतीदायक झाले आहे. त्यामुळे यावर्षी कांद्याची लागवड ठिबक सिंचनाद्वारे केली आहे. यामुळे भांडवली खर्चात वाढ होणार आहे.
- मनेष बुट्टे पाटील, स्थानिक शेतकरी
2964