जुन्नर, ता. १९ ः जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये स्ट्रॉबेरी पिकाला पोषक वातावरण असल्याने गेल्या काही दिवसांपासून बहुतांशी शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरी लागवडीकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. स्ट्रॉबेरी म्हटलं की डोळ्यासमोर महाबळेश्वर, पाचगणी हा भाग येतो मात्र आता जुन्नरच्या आदिवासी भागातही स्ट्रॉबेरीचे पिक घेण्यास सुरुवात झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्यास मदत होईल. तसेच, जुन्नरच्या नागरिकांना तालुक्यातीलच स्ट्रॉबेरीचा आस्वाद मिळेल.
जुन्नरच्या आदिवासी भागातील खडकुंबे येथील शेतकरी जिजाराम करवंदे या शेतकऱ्याने आंब्याच्या बागेत स्ट्रॉबेरी पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. करवंदे यांनी दहा गुंठे क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर पाच हजार ४०० रोपांची लागवड केली आहे. लागवडीसाठी विंटर डॉन या प्रजातीची रोपे नारायणगाव येथील रोपवाटिकेमधून घेण्यात आली. पन्नास ते साठ दिवसांनी फळांची तोडणीस सुरुवात होते. स्ट्रॉबेरीची रोपे, मजुरी, खते व औषधे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन यासाठी जवळपास पन्नास हजाराहून अधिक खर्च झाला असल्याचे करवंदे यांनी सांगितले. यासाठी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, कृषी सहायक रोहिदास विरणक यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील उच्च्छिल, शिरोली तर्फे कुकडनेर, खडकुंबे, आंबे, हातवीज या गावामध्ये एकूण ३० शेतकऱ्यांनी पाच हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. स्ट्रॉबेरी पिकासाठी आदिवासी भागातील हवामान पोषक असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करावी व अधिक मार्गदर्शन लागल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भोसले यांनी केले आहे.