जुन्नर, ता. १७ : जुन्नर येथील राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये ३ हजार ३१० प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली, तर प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणातील २ कोटी ५० लाख ९७ हजार २७४ रुपये इतक्या रकमेची वसुली करण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या सौजन्याने, तसेच तालुका विधी सेवा समिती जुन्नर यांच्या वतीने जिल्हा व अति. सत्र न्यायालय जुन्नर येथे शनिवारी (ता. १३) राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. उच्च न्यायालयाचे पालक न्यायाधीश न्या. आरिफ डॉक्टर व न्या. संदीप यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उद्घाटन करत मार्गदर्शन केले.
जुन्नर न्यायालयातील लोकन्यायालयाचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय जुन्नरचे जिल्हा न्यायाधीश एस. बी. शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार विधिसेवा प्राधीकरण आपल्यापर्यंत पोहोचत आहे. पक्षकारांनी लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपली प्रलंबित प्रकरणे निकाली काढून आयुष्यातील महत्त्वाचा वेळ आणि पैसा वाचवावा, असे आवाहन न्या. शेलार यांनी यावेळी केले.
या लोकन्यायालयामध्ये दिवाणी दावे, फौजदारी दावे, दावा दाखल पूर्व बँकेची वसुली प्रकरणे, ग्रामपंचायत, महावितरण, पतसंस्था, फायनान्सची प्रकरणे तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती. दिवसभराच्या कामकाजात लोकन्यायालयाचे ५ पॅनेलमध्ये दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे म्हणणे ऐकून व त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याद्वारे एकूण ३ हजार ३१० प्रकरणे आपसी समझोता व तडजोड करून निकाली काढण्यात आली. यासोबतच प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांतील रक्कम २ कोटी ५० लाख ९७ हजार २७४ रुपये रक्कमेची वसुली करण्यात आली.
यावेळी न्या. ए. एम. हुसेन, न्या. एन. एम. बिरादार, न्या. ए. एच. बाजड, न्या. एस. एस. जैन, जुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवदास तांबे, उपाध्यक्ष महावीर चोरडिया, सचिव आशिष वानखेडे, लोक अदालत पॅनेल सदस्य ॲड. निलीमा शेरकर, ॲड. स्वाती दुराफे, ॲड. सोनल खरात, ॲड। समकित नानावटी, ॲड. रवींद्र नायकोडी आदी उपस्थित होते.