जुन्नर, ता. २३ : जुन्नर नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीला सत्ताधारी शिवसेना व शिवजन्मभूमी विकास मंचच्या नगरसेवकांनी दांडी मारल्याने विषय समितीच्या सभापती व सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रियाच रद्द करण्याची नामुष्की आली. सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी जाणीवपूर्वक सभेला गैरहजेरी लावल्याचा आरोप जुन्नर शहर विकास आघाडीच्या गटनेत्या वैष्णवी पांडे यांनी केला, तर पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्याने या निवड प्रक्रियेला उपस्थित राहिलो नसल्याचे शिवसेना शिवजन्मभूमी विकास मंच या सत्ताधारी गटाचे गटनेते विक्रम परदेशी यांनी सांगितले.
जुन्नर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक गत महिन्यात पार पडली. मागील आठवड्यात उपनगराध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर नगरपरिषदेच्या कामकाजात सुरळीतपणा यावा, यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषय समितीच्या सभापती व सदस्यांच्या निवडीची प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया शुक्रवारी घेण्याचे आदेश दिले होते. या प्रक्रियेसाठी पीठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती.
दरम्यान, शुक्रवारी (ता. २३) नगरपरिषदेच्या छत्रपती संभाजी राजे सभागृहामध्ये पीठासन अधिकारी डॉ. चरण कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली. या सभेसाठी नगराध्यक्षा सुजाता काजळे, उपनगराध्यक्षा रुपाली परदेशी, शहर विकास आघाडीच्या गटनेत्या वैष्णवी पांडे, नगरसेवक अनुजा पातुरकर, सना मन्सुरी, प्रशांत सराईकर, साकी सय्यद, वाजिद इनामदार, आकिफ इनामदार, भाऊ कुंभार हजर होते. सभा सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांनी पीठासन अधिकारी कोल्हे यांनी गणपूर्तीअभावी निवडणूक प्रक्रिया रद्द केली व सभागृहातून पळ काढल्याचा आरोप गटनेत्या पांडे यांनी केला. तर, प्रशासकीय अधिकाऱ्याचे असे बेकायदेशीर वागणे हे लोकप्रतिनिधींचा अवमान करणारे आहे. जुन्नर शहराच्या हितासाठी विषय समित्या स्थापित होणे हे नगरपालिका कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी अत्यंत गरजेचे होते. मात्र, शहर विकासाच्या दृष्टीने प्रशासकीय अडथळा निर्माण केला जात असून, सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असूनदेखील निवडणूक प्रक्रियेला प्रशासनाच्या माध्यमातून सामोरे जाण्यासाठी सत्ताधारी घाबरत असल्याचा आरोप पांडे यांनी केला.
सत्ताधारी गटातील सदस्यांचा एकमेकांवर विश्वास नसल्याने निवडणुकीतून सत्ताधारी पक्षाने पळ काढला आहे. शहर विकास आघाडीच्या डावपेचांमुळे सत्ताधारी पक्षातील सदस्य संभ्रमात असून, मुख्याधिकारी कोल्हे यांच्या या बेजबाबदार वर्तनाविरोधात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे गटनेते पांडे यांनी सांगितले.
...म्हणून सभेला सभेला गैरहजर
याबाबत सत्ताधारी शिवसेना शिवजन्मभूमी विकास मंचचे गटनेते विक्रम परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंगळवारी (ता. १३) नगराध्यक्षा सुजाता काजळे यांनी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बेकायदेशीरपणे पार पाडली. या प्रक्रियेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. अद्याप या तक्रारीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने, तसेच पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार आमच्या गटाचे नगरसेवक या सभेला गैरहजर राहिले आहेत.
पीठासन अधिकारी यांनी सभागृहात थांबणे गरजेचे होते. मुख्याधिकारी अकरा वाजता सभागृहात आले. अवघ्या दोन तीन मिनिटात मुख्याधिकारी सभागृहाच्या बाहेर गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आदेश डावलून मुख्याधिकारी यांनी कामकाज केले आहे.
सुजाता काजळे, नगराध्यक्षा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.