जुन्नर, ता. २२ : शिवजयंतीच्या औचित्याने शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरात कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. या आखाड्यात अंतिम कुस्तीचा मान महाराष्ट्र केसरी २०२५ ठरलेल्या पुणे येथील काका पवार तालमीत असणाऱ्या सांगली येथील वेताळ ऊर्फ दादा शेळके यांनी पटकाविला. दोन लाख रुपये व चांदीची गदा या बक्षिसाने वेताळ यांचा सन्मान करण्यात आला. तर उपविजेता होण्याचा मान मुंबई महापौर केसरी ठरलेल्या भारत मदने यांनी पटकाविला.
जुन्नर येथे शिवजयंतीच्या निमित्ताने बुधवार (ता. १८) भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे या जिल्ह्यांमधून आलेल्या १७५ पेक्षा अधिक पैलवानांनी सहभाग नोंदविला. तालुक्यात प्रथमच महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान कुस्त्यांच्या स्पर्धेसाठी आणण्याचा मान शरद सोनवणे यांनी पटकाविला असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. कुस्त्यांच्या स्पर्धांचा अनुभव घेण्यासाठी तालुक्यातील हजारोंच्या संख्येने कुस्तीशौकिनांनी गर्दी केली होती. कुस्त्यांच्या स्पर्धा प्रेक्षकांना पाहण्यासाठी आयोजकांकडून उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी अंतिम निकालाची कुस्ती आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते लावण्यात आली. स्पर्धेचे नियोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण, सचिन वाळुंज, दर्शन फुलपगार, जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जगन कोऱ्हाळे, कार्याध्यक्ष जालिंदर ढमाले, सचिव विलास कदम, सदस्य सुरेश काकडे, आदेश रायकर, बाबाजी चव्हाण, सुनील गायकवाड, योगेश शिंदे यांनी केले. स्पर्धा पार पाडण्यासाठी जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाचे विशेष योगदान लाभले. स्पर्धेचे निवेदन युवराज सोलनकर यांनी केले.
3281