वडापुरी, ता. ३१ : बावडा- भगतवाडी- पिठेवाडी (ता. इंदापूर) या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ते लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठी सेवा संघ यांच्या वतीने उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग इंदापूर यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, इंदापूर तालुक्यातील बावडा- भगतवाडी- पिठेवाडी- कचरवाडी रस्त्यासाठी २०२१- २०२२ मध्ये अंदाजपत्रके ६० कोटी १८ लाख ५०५३ रुपये इतकी रक्कम मंजूर झालेली होती. मात्र, ज्या कंपनीला हे काम मिळाले त्या कंपनीने ते निकृष्ट दर्जाचे केले. त्यामुळे वरील रस्त्यावर दोन वर्षाच्या आतमध्ये मोठमोठे खड्डे पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती होण्याबाबत ३ ऑक्टोबर २०२५ रोजी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने वरील रस्ता दुरुस्त्या करण्यासंदर्भात निवेदन दिले होते व संबंधित ठेकेदारास वेळोवेळी संपर्क करून दुरुस्ती करण्याबाबत विनंती केली होती. मात्र, याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा भाजप व अखिल भारतीय मराठी सेवा संघ यांच्या वतीने ९ जानेवारी रोजी वरील रस्त्याच्या खड्ड्यामध्ये वृक्ष लागवड करून त्या ठिकाणी उपोषण करण्यात येईल.
या निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देण्यात आली असल्याचे संघटन सर चिटणीस सचिन सावंत यांनी सांगितले.