भोर, ता. २४ : भोर मतदारसंघात महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी १९ हजार ६३८ मतांनी पराभव केला. सलग तीन वेळा आमदार राहिलेले संग्राम थोपटे यांचा भोर तालुक्यात नवीन चेहरा असलेल्या शंकर मांडेकर यांनी दारुण पराभव केल्यामुळे केवळ संग्राम थोपटेच नव्हे तर कॉँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची चर्चा सुरु आहे.
मतदारसंघात वाढलेली मतदार संख्या आणि भोर व वेल्हे तालुक्यांतून ७३ टक्के मतदान होऊनही आमदार संग्राम थोपटे यांचा पराभव झाला. भोर तालुक्यातील संग्राम थोपटे यांचे सर्व विरोधकांनी एकजुटीने शंकर मांडेकर यांचा प्रचार केला. भोर आणि वेल्हा तालुक्यांतील कॉँग्रेसप्रेमींना हा पराभव जिव्हारी लागला आहे. यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतानाही विधानसभेचे अध्यक्षपद नाही, मंत्रिपद नाही आणि कुठल्याही महामंडळाचे अध्यक्षपदही मिळाले नाही. आणि राज्यात महायुतीची सत्ता आली तरीही संग्राम थोपटे यांनी मतदारसंघात कित्येक कोटींची विकासकामे केली आहेत. तरीही मतदारसंघातील मतदारांनी संग्राम थोपटे यांना नाकारले.
राज्य सरकारची लाडकी बहीण योजना, महिलांसाठी एसटीच्या दरात पन्नास टक्के सवलत, शेतकरी सन्मान योजना, ज्येष्ठांसाठी वयश्री योजना आणि तिर्थदर्शन योजना यासारख्या योजनांमुळे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना फायदा झाला. याशिवाय १५ वर्षांत भोर तालुक्यातील बेरोजगारी, सिंचनाचे प्रश्न, भोर एसटी डेपो बंद पडण्याच्या मार्गावर असूनही प्रवाशांना सेवा देण्यासाठी न केले प्रयत्न आणि बंद पडलेला राजगड सहकारी साखर कारखानामुळे भोर तालुक्यात नाराजी वाढत गेली. मतदारांनी उघडपणे न बोलता मतांमधून आणि नाराजी व्यक्त केली. संग्राम थोपटे यांनी मतदारसंघातील मुळशी तालुक्यात सर्वाधिक विकासकामे करूनही त्यांना मुळशी तालुक्यातून अपेक्षीत मतदान झाले नाही. तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी मुळशीकर एकवटले आणि शंकर मांडेकर यांना मताधिक्य दिले. याखेरीज भाजपचे बंडखोर उमेदवार किरण दगडे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या बंडखोरीचा फटकाही संग्राम थोपटे यांना बसला.
पवारांची सोबत निष्ठावंतांना आवडली नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर संग्राम थोपटे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत गेले. वडील अनंतराव थोपटे यांच्या कारकिर्दीत राजकीय शत्रू म्हणून ओळखले जात असलेले शरद पवार यांच्यासोबत जाणे हे काँग्रेसच्या काही निष्ठावंतांना आवडले नाही. याचाही फटका संग्राम थोपटे यांना बसल्याचे बोलले जात आहे. याशिवाय सभांमधून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकांमुळेही मतदारांच्या नाराजीत भर पडली. या सर्व गोष्टींवर आत्मपरीक्षण करून कॉँग्रेसला पुढील वाटचाल करावी लागणार आहे.
चौकट
संग्राम थोपटे यांच्या पराभवाची कारणे
- भोर तालुक्यातील बेरोजगारी, प्रवाशांना न मिळणाऱ्या प्रवासी सेवा आणि बंद पडलेला राजगड सहकारी साखर कारखाना यामुळे वाढलेली नाराजी.
- जाहीरनाम्यात आणि सभांमधून नवमतदारांबाबत कुठल्याही प्रकारचे भाष्य नाही.
- किरण दगडे आणि कुलदीप कोंडे यांची बंडखोरी
- राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत राहून सुप्रिया सुळे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
- मुळशी तालुक्यातील मतदारांनी तालुक्याची अस्मिता जपली
- अजित पवारांवर केलेल्या टिकांमुळे नाराजी वाढत गेली
ssociated Media Ids : BHR24B04583, BHR24B04584
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.