भोर, ता. २५ : जिल्हा बँकेकडून शून्य टक्के व्याजदराने घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करण्याकडे भोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.२४ ) अखेर केवळ १६ टक्केच पीक कर्जाची परतफेड केली आहे. मागील वर्षाच्या खरीप हंगामासाठी तालुक्यातील १२ हजार ४९४ शेतकऱ्यांनी आठ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रासाठी १०१ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांचे पीककर्ज घेतलेले आहे. त्यापैकी केवळ १६ कोटी रुपयांची परतफेड झाली आहे., अशी माहिती बँकेचे विभागीय अधिकारी आणि वसुली अधिकारी विनोद काकडे यांनी दिली.
पीक कर्जाबाबत काकडे यांनी सांगितले की, मागील वर्षी एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत खरीप हंगामासाठी भोर तालुक्यातील जिल्हा बँकेच्या १० शाखांशी संलग्न असलेल्या ६८ विकास सोसायटींमधून १०१ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांच्या पीककर्जाचे वाटप केलेले आहे. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने असलेल्या या पीककर्जाच्या परतफेडीची कालावधी ३१ मार्च २०२५ रोजी संपणार आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत परतफेड केलेल्या शून्य टक्के व्याजदाराचा लाभ मिळणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना १२ टक्के व्याज द्यावे लागणार आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा बाकी असताना कर्जाच्या परतफेडीचा भरणा करण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होत असते. परंतु यावर्षी अजूनही शेतकरी भरणा करण्यासाठी येत नाहीत. कर्जधारक शेतकऱ्यांनी शून्य टक्के व्याजदराचा लाभ घेण्यासाठी मुदतीच कर्जाची परतफेड करावी, असे आवाहनही विनोद काकडे यांनी केले. राज्य सरकारच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची योजना जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी कर्जाची परतफेड करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.