भोर, ता. ८ : शहरात सर्वच ठिकाणी प्लॅस्टिकचा सर्रास वापर होत असून प्लॅस्टिकबंदी ही फक्त नावालाच राहिलेली आहे. नगरपालिका प्रशासनाकडून प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.
शहरातील कपडे, किराणा माल, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, भाजी मंडई, मोबाइल, कपडे, खेळणी, दारुची आदी दुकाने याशिवाय मंगळवारच्या आठवडे बाजारातदेखील भाजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरल्या जात आहेत. शासनाच्या नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी एकदा वापरून फेकून देणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू टाळणे आणि कापडी, ज्यूट किंवा इतर टिकाऊ पिशव्या वापरणे बंधनकारक केले आहे. पुन्हा वापरण्यायोग्य पिशव्यांचा वापर करावा, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे; मात्र सर्व नियम पायदळी तुडवत प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू झाला आहे. नगरपालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी दररोज घंटागाड्या प्रत्येक गल्लीतून जात आहेत. नागरिक ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून त्यामध्ये टाकत असतात. मात्र, सुक्या कचऱ्यात सर्वाधिक प्लॅस्टिकच असते. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर किती मोठ्या प्रमाणात होतो. हे दिसून येत आहे. मागील तीन वर्षात नगरपालिका प्रशासनाने प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. प्लॅस्टिकचा वापर करून नये याबाबत नगरपालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे नागरिक लक्ष देत नसल्याने भोरवासीयांची अवस्था कळतंय व वळत नाही, अशी झाली आहे.
शहरात प्लॅस्टिकबंदी असून नियमबाह्य प्लॅस्टिकची विक्री करणाऱ्यांवर आणि वापर करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. यासाठी दोन पथके तयार केली असून त्यामार्फत शहरात आठवडे बाजारासह सर्वत्र तपासणी करण्यात येत आहे.
- गजानन शिंदे, मुख्याधिकारी भोर, नगरपालिका.
6183