बारामती, ता. १० : राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात बारामती इंडियन मेडीकल असोसिएशनकडून (आयएमए) शुक्रवारी (ता. ११) अत्यावश्यक सेवा वगळता वैद्यकीय सेवा २४ तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
फार्माकॉलॉजी या विषयात एक वर्षाचा ब्रिज कोर्स करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करणार आहेत. १५ जुलैपासून ही नोंदणी सुरू होईल. ती पूर्ण केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टर्स अॅलोपॅथीची औषधे लिहून देऊ शकतील. अर्थातच त्यांना कौन्सिलची मान्यता राहणार आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात शुक्रवारी (ता. ११) बंद पुकारला जाणार असून, १९ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती ‘आयएमए’च्या बारामती शाखेचे अध्यक्ष डॉ. संतोष घालमे, सचिव डॉ. अमोल भंडारे व खजिनदार डॉ. सौरभ निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी कार्यकारिणीतील डॉ. अशोक तांबे, डॉ. संजय पुरंदरे, डॉ. महेंद्र दोशी, डॉ. विक्रांत धोपाडे, डॉ. दिनेश ओसवाल, डॉ. सौरभ मुथा, डॉ.विभावरी सोळुंके, डॉ. स्नेहलता पवार, डॉ. रेवती संत, डॉ. प्राजक्ता पुरंदरे, डॉ. दीपिका कोकणे, डॉ. शुभांगी वाघमोडे आदी उपस्थित होते.