पुणे

बारामतीसाठी परिपूर्ण योगदान देणारा नेता : अजितदादा पवार

CD

बारामतीसाठी परिपूर्ण योगदान देणारा नेता : अजितदादा पवार
- अनिल नवरंगे,
युनिव्हर्सल स्पोर्ट्‌स अँड कल्चरल फाउंडेशन. ठाणे


बारामतीकरांसाठी सातत्याने काहीतरी चांगले केले पाहिजे, त्यांना अधिकाधिक उत्तम सुविधा दिल्या पाहिजेत, आपल्याला अनेक वर्षे बारामतीकरांनी सातत्याने पाठिंबा दिला आहे. त्याची परतफेड आपण तितक्याच ताकदीने केली पाहिजे, या भूमिकेतून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काम करतात, हे मी जवळून अनुभवले आहे.

माझे स्नेही अजितदादा पवार यांचे सचिव सतीश मोघे, डॉ. संजय ओक यांच्या समन्वयातून बारामतीला डॉ. ओक सरांची दोन शिबिरे पार पडली. अजितदादांच्या सूचनेनुसार वर्षातून किमान चार शिबिरे बारामतीत करण्याचा आमचा मानस आहे. पण या शिबिराच्या आयोजनाच्या निमित्ताने अजित पवार, सुनेत्रावहिनी पवार यांचा परिचय झाला, त्यांच्या स्वभावगुणांविषयी माहिती झाली.
राज्यातील लाखो कार्यकर्ते का अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, बारामतीकर १९९५ पासून त्यांनाच का सलगपणे निवडून देतात? सत्तेत असो वा नसो त्यांचे काम का अडत नाही? यां सारख्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे दादांचा सहवास लाभल्यानंतर आपोआपच मिळत गेली.
वास्तविक, मी बांधकाम व्यावसायिक. माझे कार्यक्षेत्र ठाणे शहर आहे. बारामतीचा आणि माझा तसा फारसा संबंध नव्हता पण सतीश मोघे सरांशी माझी ओळख असल्याने डॉ. संजय ओक यांच्या शिबिराची माहिती त्यांना मिळाली त्यानंतर त्यांनी अजितदादांसोबत एक बैठक घडवून आणण्याचे ठरविले.
माझ्यासह अँड. प्रशांत पंचाक्षरी, अँड. राजन अभ्यंकर, अनिल जोगळेकर, पंकज पात्रीकर आम्ही एकत्र येत युनिव्हर्सल स्पोर्ट्‌स अँड कल्चरल फाउंडेशन ही सामाजिक संस्था स्थापन केली. सुनील गावसकर यांचा मी निस्सीम चाहता असल्याने त्यांची चँम्प्स फाउंडेशन ही संस्था व शिशुशल्य सेवेत अग्रगण्य असलेल्या डॉ. संजय ओक यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया या दोन गोष्टी मी जवळून बघत होतो.
कोविडच्या काळात शासनाने ओक सरांवर टास्क फोर्सची जबाबदारी सोपविली होती. मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ठाणे येथील कौशल्य मेडिकल फाउंडेशनचे अधिष्ठाता म्हणूनही ओक सर कार्यरत आहेत. लहान बालकांच्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्याचे काम संजय ओक हे सातत्याने करीत आहेत. त्यांचा वैद्यकीय व वाहनविषयक खर्च आम्ही युनिव्हर्सल स्पोर्ट्‌स व कल्चरल फाउंडेशनच्या माध्यमातून करतो.
सतीश मोघे सरांनी माझ्यासह ओक सरांची अजितदादांसोबत जेव्हा भेट घडवून आणली, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आम्ही प्रभावित झालो. प्रचंड आवाका असलेला पण तेवढ्याच विनम्रपणे आम्हाला बारामतीसाठी शिबिरे घेण्याची विनंती त्यांनी केली. तेव्हा बारामतीकरांविषयी त्यांची आस्था आम्हाला दिसली.
बारामतीत आम्ही पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे, असे त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साधारण कसे असेल असे चित्र मनात होत?, पण बारामतीत येऊन जेव्हा आम्ही प्रत्यक्षात हे महाविद्यालय पाहिले, आमचा आमच्या डोळ्यांवरच विश्‍वास बसत नव्हता की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इतके अत्याधुनिक सुसज्ज आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या दर्जाचे असू शकते. येथील रचना व सोयीसुविधा अचंबित करण्यासारख्या आहेत.

अचूकतेचा आग्रह
अजितदादांनी बारामतीत हे रुग्णालय स्वतः जातीने लक्ष घालून उभारल्याची माहिती मिळाली, त्या नंतरही ते जेव्हा जेव्हा रुग्णालयात आले तेव्हा त्यांची बारीक नजर व अचूकतेचा आग्रह पाहून लोकप्रतिनिधींनी जर असे लक्ष प्रत्येक मतदारसंघात दिले तर त्याची बारामती होईल, याचा मला विश्‍वास वाटतो.

बारामतीत शिबिर करण्याचे निश्‍चित झाल्यानंतर एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी ही जबाबादारी स्वीकारली. त्यांनी सर्वतोपरी मदत केली, सूचना केल्या आणि दोन्ही शिबिरे यशस्वी करण्यासाठी मोलाचा हातभार लावला हे मला नमूद करावेसे वाटते. डॉ. संतोष भोसले, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा, अजितदादांचे स्वीय सहायक सचिन यादव, नितीन हाटे यांनीही मोलाचे सहकार्य केले.

दुसऱ्या शिबिराच्या वेळेस स्वत: अजितदादा भेट द्यायला वेळ काढून आले. डॉ. संजय ओक शस्त्रक्रिया करण्यात व्यग्र असल्याने मला अजितदादांसमवेत संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांचे अचूकपणे विचारलेले प्रश्‍न, त्यांची दृष्टी, त्यांची अफाट माहिती आणि ज्ञान, त्यांची निर्णयक्षमता हे सगळे बघून मी भारावून गेलो. बारामतीकरांना सातत्याने काहीतरी चांगले मिळायला हवे, त्यांचा अधिकचा खर्च होऊ नये, ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांनाही दर्जेदार उपचार आणि शस्त्रक्रिया विनामूल्य व्हाव्यात या साठी अजितदादांची धडपड असते. डॉ. ओक सरांचा कँप बारामतीत व्हावा या साठी दादांनी त्या साठीच आग्रह केला. अनेक गरजू रुग्णांना यामुळे बारामतीत उपचार शक्य होतील, शस्त्रक्रिया होतील, ही बाब त्यांना समजली होती.

ऋण व्यक्त करण्यासाठी तत्पर
दादा एक कणखर व शिस्तप्रिय नेते असले तरी बारामतीचा जेव्हा विषय येतो तेव्हा ते हळवे होतात, या शहरासाठी तेथील लोकांसाठी सातत्याने काहीतरी करत राहायला हवे, लोकांनी आपल्याला प्रचंड मताधिक्याने लोकप्रतिनिधी केलेले आहे, त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपणही रात्रीचा दिवस केला पाहिजे, या भावनेतून ते कार्यरत असतात.
पहाटे पाच पासून त्यांचा सुरू होणारा दिवस, हजारो लोकांच्या गाठीभेटी, धडाधड कामे मार्गी लावण्याची त्यांची कामाची पध्दत, निर्णय घेताना निःसंदिग्धपणे घेत, त्यावर कार्यवाही करण्यासह वेळेत काम पूर्ण करण्याचा आग्रह, नीटनेटकेपणा टापटीप या बाबी मला मंत्रमुग्ध करून गेल्या. एखाद्या लोकप्रतिनिधीविषयी आस्था आपुलकी निर्माण व्हावी, त्याच्यासोबत स्नेहबंध निर्माण व्हावेत, असेच अजितदादांचे व्यक्तिमत्त्व आहे. नेतृत्वातील कणखरपणा त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि शब्दातून व्यक्त होताना मी पाहिला. विषयाचे आकलन, माहितीचा असलेला खजिना, प्रदीर्घ अनुभव, प्रशासनातील बारकावे माहिती असणे व त्यावर असलेली पकड या बाबीही प्रभावित करणाऱ्या ठरल्या.
बारामती शहरात जेव्हा जेव्हा फिरलो, त्या शहराची स्वच्छता, टापटीपपणा, व्यवस्थित नियोजन, नागरिकांचे राहणीमान अधिक चांगले कसे असेल या साठी केलेले प्रयत्न, शहरात जाणीवपूर्वक लावलेली झाडे, तेथे उभारलेल्या विविध शासकीय इमारती, त्या इमारतींना दिलेला कार्पोरेट लूक या बाबी पाहिल्यानंतर येथील मतदार या नेत्याच्या मागे का उभा राहतो हे सहज लक्षात आले.

सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटलसाठी प्रयत्न
बारामतीच्या आरोग्यसेवेबाबत माझ्याशी बोलताना दादांनी भविष्यातील अनेक प्लॅन सांगितले. कॅन्सर हॉस्पिटलचाही त्यातील एक प्लॅन. त्यांचे स्वप्न आहे की बारामतीत सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल व्हायला हवे. त्यांचे त्या साठी प्रयत्न सुरू आहेत, जागाही मिळाली असून येत्या काही वर्षात प्रत्यक्ष वास्तू उभारण्याचे त्यांनी ठरविले आहे. हे हॉस्पिटल ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी केवळ बारामतीच नव्हे तर पंचक्रोशीतील असंख्य कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळेल यात शंका नाही.

बारामतीत मी आणि डॉ. संजय ओक सर आम्ही शिबिरांच्या माध्यमातून आलो, पण दादांची कार्यपद्धती, सुनेत्रावहिनींची आपुलकी व स्नेह येथील प्रत्येक घटकाने केलेले सहकार्य पाहिल्यानंतर आदरणीय अजितदादा व बारामतीशी आमचे ऋणानुबंध अधिक घट्ट झाल्याची भावना आहे. आयुष्यामध्ये काही व्यक्तींचा सहवास लाभल्यानंतर आपणही अधिक प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल करतो, माझ्या बाबतीत अजितदादांच्या सहवासाने तसे काहीसे घडले आहे. त्यांच्या सहकार्याने बारामतीकरांसाठी नियमित आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. दर शिबिरातील लाभार्थी रुग्णांची संख्या वाढत जावी या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.
केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातच नव्हे तर राज्यात बारामतीसारखे सर्वांगसुंदर व नियोजनबद्ध विकसित केलेले गाव क्वचितच पाहायला मिळेल. बारामतीला घडविणाऱ्या आणि कायम अग्रेसर ठेवणाऱ्या अजितदादा पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

SCROLL FOR NEXT