महाराष्ट्राच्या राजकारणात विकासाचा नवा अध्याय घडवणारे, प्रशासनात पारदर्शकता व कडक शिस्तीचा आदर्श घालून देणारे आणि सामान्य जनतेशी सदैव संवाद राखणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस! या औचित्याने त्यांच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, स्वच्छता, कृषी, अर्थ आणि आरोग्य क्षेत्रांतील अतुलनीय योगदानाचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
शिक्षणाचा दीपप्रकाश ग्रामीण महाराष्ट्रात
अजितदादांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान हे दूरदृष्टी व समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे. विद्या प्रतिष्ठान, बारामती, रयत शिक्षण संस्था, सातारा व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थांद्वारे त्यांनी हजारो विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाचे दरवाजे खुले केले. शाळांपासून आयटी, कृषी, अभियांत्रिकी, आरोग्य व व्यवस्थापन महाविद्यालयांपर्यंत संपूर्ण शिक्षणसाखळी उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळवून दिली. त्यांच्या दूरदृष्टी व कल्पकता यासाठी बारामतीमध्ये उभारलेल्या अद्ययावत आयुर्वेदिक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय या वास्तूंना एकदा आवर्जून भेट द्यावी.
क्रीडा संस्कृतीचा विकास : ‘खेळाडू घडविणारा नेता’
‘क्रीडाशक्ती ही राष्ट्रशक्ती’ हे ब्रीद घेऊन अजितदादांनी जिल्हास्तरावर क्रीडा संकुल, व्यायामशाळा उभारून दिल्या. बालेवाडी स्टेडियम आणि बारामती क्रीडा संकुल हे त्यांच्या क्रीडाभिमुख धोरणांचे जिवंत उदाहरण आहे. खेळाडूंना प्रशिक्षण, निवास, आहार व आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी त्यांनी शासनाच्या पातळीवर ठोस निर्णय घेतले.
स्वच्छता मोहिमेत कटाक्ष
‘स्वच्छ महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र’ या दृष्टिकोनातून त्यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, घरोघरी स्वच्छतागृह, स्वच्छ गाव स्पर्धा आणि समाज सहभाग वाढवणारे उपक्रम प्रभावीपणे राबवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे उघड्यावर शौचमुक्त (ओडीएफ) गावे निर्माण झाली आणि स्वच्छतेची चळवळ जनतेच्या मनात रुजली. स्वच्छ, सुंदर, हरित बारामती पाहिली की त्यांच्या नेतृत्वाचा अंदाज येतो. एक नेता मनात आणले, तर काय काय करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादा पवार.
‘एआय’च्या साहाय्याने कृषीक्रांती
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून अजितदादांनी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कंबर कसली आहे. पीक व्यवस्थापन, हवामान भाकीत, ड्रोनद्वारे पीक निरीक्षण, बाजारभाव सल्ला, कर्ज व विमा मार्गदर्शन आणि ‘एआय’ आधारित प्रशिक्षण देणाऱ्या बारामतीमधील ‘कृषी विकास प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती यांचा संगम साधला. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी राज्य शासनाकडून ५०० कोटी रुपयांचा भरीव निधी त्यांनी उपलब्ध करून दिल्याने आता ते अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न व उत्पादन देणारी शेती शेतकऱ्यांकडून व्हावी, या दृष्टीने अजितदादा पवार यांचा पुढाकार विशेष उल्लेखनीय म्हणावा लागेल. काळाची पावले ओळखून बदल करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
आरोग्य क्षेत्रात सशक्त पावले
करोनाकाळात आरोग्य सेवा बळकट करणाऱ्या योजना, जिल्हा रुग्णालयांचे आधुनिकीकरण, आरोग्य कर्मचाऱ्यांना सुविधा व वैद्यकीय उपकरणांसाठी निधी यामध्ये अजितदादांनी पुढाकार घेतला. आरोग्य ही प्राथमिक गरज असल्याची जाणीव ठेवून त्यांनी गरजूंना सहज सुविधा मिळाव्यात यासाठी शासन यंत्रणा सजग ठेवली.
अर्थखात्याचे कुशल नियोजन
एक दूरदृष्टी असलेला अर्थतज्ज्ञ म्हणून अजितदादांनी करोना काळातील आर्थिक संकट, शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारीवरील
उपाययोजना आणि व्यवसायांना दिलासा देणाऱ्या वित्तीय धोरणांची अंमलबजावणी केली. बजेट सादरीकरणातील स्पष्टता, आकडेवारीवर पकड आणि धोरणात्मक भान यामुळे त्यांनी अर्थखात्याला नवी दिशा दिली.
जनसामान्यांचा नेता : संवाद आणि समर्पण
अजितदादांचे राजकारण हे केवळ सत्ताकेंद्रित न राहता जनतेशी जोडलेले आहे. बारामतीपासून मंत्रालयापर्यंत त्यांनी एक विश्वासाचा पूल उभा केला आहे. गावोगावचा दौरा, समस्यांची थेट नोंद आणि तत्काळ उपाययोजना हे त्यांचं विशेषत्वे राहिले आहे. त्यांनी ‘कार्यसंस्कृती, पारदर्शकता आणि कार्यक्षम निर्णयक्षमता’ या त्रिसूत्रीच्या जोरावर प्रशासनाला विकासाभिमुख बनवले.
अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करताना राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. आज त्यांचे नाव केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा आधारस्तंभ म्हणून घेतले जाते.
‘शिस्त, समर्पण आणि संवेदनशीलता’ यांचे मिलाफ असलेले त्यांचे नेतृत्व ही आजच्या महाराष्ट्रासाठी मोठी ताकद आहे.
अशा या अष्टपैलू, अभ्यासू, दूरदृष्टी असलेल्या नेत्यास त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि आगामी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
- डॉ. भरत शिंदे,
प्राचार्य, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.