पुणे

विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवणारे नेतृत्व...अजित पवार

CD

राजकारणात प्रदीर्घकाळ कोणाचेच वर्चस्व राहत नाही. कालांतराने राजकीय जीवनात चढउतार येतात. बारामती मतदारसंघ हा केवळ राज्यातच नाही, तर देशात कायम चर्चेत असलेला मतदारसंघ असतो. १९६७ पासून बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. त्यातही सन १९९१ पासून अजित पवार सलग बारामती विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. अनेकदा राजकीय विश्लेषक व राज्यभरातील नागरिक अजित पवार सातत्याने बारामतीतून विक्रमी मतांनी कसे निवडून येतात.... याबाबत चर्चा करताना दिसतात. बारामतीकर अजित पवारांच्या पाठीशी का उभे राहतात हे जाणून घ्यायचे असेल तर किमान एकदा तरी बारामतीला भेट देणे आवश्यक आहे.
- मिलिंद संगई, बारामती

राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल तर परिवर्तन कशा पद्धतीने घडू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून बारामतीकडे पाहता येईल. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या साडेतीन दशकाहून अधिक काळ अजित पवार यांनी आपल्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून या शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

राज्यातील क्वचितच एखादा आमदार पहाटे पाच वाजता उठून सकाळी सहा वाजता मतदार संघातील विकास कामांची पाहणी करण्याकरिता बाहेर पडत असेल. प्रत्येकाला व्यक्तिगत भेटून, त्याच्या अडचणी समजून त्यावर तातडीने निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी ही दुर्मिळच म्हणावे लागतील.
एकीकडे सार्वजनिक कामे मार्गी लावण्यासह दुसरीकडे मतदारसंघातील नागरिकांची वैयक्तिक स्वरूपाची कामे देखील अजित पवार तेवढ्याच तर्फेने मार्गी लावताना दिसतात. मतदारांशी जोडलेली नाळ व बारामतीचा केलेला कायापालट या दोन गोष्टींमुळे अजित पवार सातत्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी होतात.

बारामतीकरांचा अनुभव सांगायचा तर, बारामती सोडून जेव्हा इतर शहरांमध्ये जाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा नकळतच त्या शहरातील बाबींची व बारामतीची तुलना होत राहते. तुलनेने अतिशय स्वच्छ, सुंदर व हरित बारामती म्हणून या बारामतीची ओळख आहे. इतर शहरांमध्ये उघडी गटारे, अस्वच्छता, अस्ताव्यस्त पडलेला कचरा व इतरही बाबी पाहिल्यानंतर बारामतीकरांना नक्कीच आपले शहर तुलनेने अधिक सुंदर, स्वच्छ व हरित आहे याची जाणीव होते.

बारामती शहरातील पायाभूत सुविधा सशक्त
गेल्या दहा वर्षात प्रामुख्याने अजित पवार यांनी बारामती शहर व बारामती तालुक्यातील विविध बाबींचा नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न केला. बारामतीतील सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींचे नूतनीकरण करण्यात आले, काही इमारती नव्याने उभारण्यात आल्या. विविध शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांसाठी उत्तम निवासस्थानांची सोय करण्यात आली असून, काही ठिकाणी या इमारती प्रगतिपथावर आहेत.
दुसरीकडे रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत व्हावे या दृष्टिकोनातून काही नवीन रस्ते तयार करण्यात आले, जुन्या रस्त्यांची डागडुजी करून ते नीट करण्यात आले. काही ठिकाणी पूल व उड्डाणपूल तर काहीठिकाणी अंडरपास निर्मिती करून अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे बारामती शहरातील पायाभूत सुविधा अधिक सशक्त झाल्या आहेत.

दादांचे योगदान निर्विवाद
बारामतीचा होणारा चौफेर विकास हा दोन गोष्टींमुळे अधिक वेगाने झाला. यामध्ये शिक्षणाच्या व आरोग्य विषयक सुविधांची निर्मिती या शहरात मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे शहराच्या अर्थकारणाला अधिक गती मिळाली. यामध्ये अजित पवार यांचे योगदान हे निर्विवाद आहे.
आज बारामती शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे रोजगाराच्या अनेक नवीन संधी या निमित्ताने निर्माण झाल्या. दुसरीकडे शासकीय व खासगी वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले, त्याचा बारामती शहराच्या बाजारपेठेवर देखील
सकारात्मक परिणाम झाला.

बारामती शहरांमध्ये उत्तम कायदा व सुव्यवस्था, पाणी, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यासह करमणुकीची साधने, उत्तम हॉटेल्स, फास्ट इंटरनेटची सुविधा व रस्त्यांचे निर्माण झालेले उत्तम जाळे या सर्वांचा विचार करून अनेक जण नव्याने सदनिका विकत किंवा भाडेतत्त्वावर घेऊन या शहरात स्थायिक होण्यास प्राधान्य देत आहेत.

बारामतीत सामाजिक सुरक्षितता उत्तम
बारामतीतील अभियांत्रिकी, वास्तुविशारद, शासकीय वैद्यकीय व आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांची धडपड सुरू असते, त्याचे कारण या शहरात असणाऱ्या उत्तम सोयीसुविधा व प्रदूषण विरहित वातावरण हे आहे. या जोडीलाच अजित पवार यांच्या प्रभावामुळे बारामती शहरातील सामाजिक सुरक्षितता देखील उत्तम आहे. येथे गुंडगिरी, दादागिरी, खंडणी, मारामाऱ्या यासारखे प्रकार घडत नाहीत. त्यामुळे एक शांत व कायदा व सुव्यवस्था असलेले शहर म्हणून बारामतीची ख्याती आहे. विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारे शहर या भावनेतूनच बारामतीकडे संपूर्ण महाराष्ट्र कायम पाहत असतो.

बारामतीतील बसस्थानक राज्यात चर्चेचा विषय
बारामतीत अजित पवार यांनी ज्या नवीन सोयी सुविधा निर्माण केल्या, त्याचा आनंद बारामतीकर मोठ्या संख्येने घेताना दिसतात. भिगवण रस्ता, परकाळे बंगला पूल परिसर, गरुड बाग, साठवण तलाव, नीरा डावा कालव्याचा परिसर, कऱ्हा नदीचा परिसर, श्रीमंत बाबूजी नाईक वाडा परिसर, नदीवरील पूल, देवीच्या मंदिरानजीक केलेल्या सुविधा, क्रीडा संकुलाजवळचा विकसित केलेला परिसर या सगळीकडेच सकाळी व संध्याकाळी लोक कायम दिसतात. पेन्सिल चौक ते गदिमा कॉर्नरपर्यंतचा हॅपी स्ट्रीट हा देखील कायम गजबजलेला असतो. बारामतीचे बसस्थानक हा देखील राज्यात चर्चेचा विषय आहे, इतके बसस्थानक सुंदर झालेले आहे.

बारामती कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू
निसर्गरम्य वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, तुलनेने कमी वर्दळ, जवळ असलेली ठिकाणे, उत्तम पायाभूत सुविधा या सगळ्या बाबी बारामतीत अजित पवार यांनी निर्माण केल्याने बारामती हा कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. बारामतीचा विकास वेगाने होत असल्यामुळे बांधकाम क्षेत्र व पायाभूत सुविधा देणाऱ्या कंपन्या यांचा देखील बारामतीत मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. वेगाने नागरिकरण होऊन देखील या शहराला कुठेही बकालपणा आलेला नाही हे महत्त्वाचे....

बारामतीत १२ ते १६ मजली इमारती
नव्याने निर्माण होत असलेल्या इमारतींमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांकडून होत आहे. बदलत्या काळानुसार आता बारामतीत १२ ते १६ मजली इमारती देखील उभ्या राहू लागल्या आहेत, लोक त्यात वास्तव्यासाठी जात आहेत ही बाब एक सामाजिक परिवर्तन समजली पाहिजे. कमी कालावधीत बारामतीचा इतका वेगाने विस्तार होईल याची काही वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही केलेली नव्हती. अजित पवार यांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक बाबी बदलल्याचे दिसते.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरास प्रोत्साहन
कृषी क्षेत्राच्या बाबतीत देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती करण्यासाठी आता अजित पवार यांनी जाणीवपूर्वक प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने ५०० कोटी रुपयांचे अनुदान या उपक्रमासाठी मिळवून देण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून तसेच ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या प्रयत्नातून कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत विविध पिकांवर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून जे प्रयोग होत आहेत त्यातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन व उत्पन्न देणारी शेती शक्य आहे ही बाब पटली आहे. त्यामुळे आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणारा पहिला तालुका म्हणून बारामतीची ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. एआय तंत्रज्ञान वापरून एकरी १०० टन ऊस बारामतीत निघाल्यामुळे आता राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील शेतकरी बारामतीच्या या प्रयोगांची माहिती घेण्यासाठी बारामतीत येत आहेत.
अजित पवार यांच्या पुढाकारातून गेल्या तीन दशकांकडून अधिक काळ रखडलेला बारामती- फलटण रेल्वे मार्गाचा प्रश्न देखील आता मार्गी लागला आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. येत्या काही वर्षात हा रेल्वे मार्ग अस्तित्वात येईल, त्यामुळे रेल्वेच्या नकाशावर बारामती हे एक महत्त्वाचे स्थानक म्हणून ठळकपणे उदयाला येणार आहे.

पंचक्रोशीतील रुग्णांना हॉस्पिटलचा थेट फायदा
दक्षिण भारतात जाण्यासाठी बारामती फलटण लोणंद मिरज रेल्वे मार्ग जवळचा ठरणार असल्यामुळे वेळ व इंधनाची मोठी बचत होणार आहे. रेल्वे मार्ग बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. आगामी काळामध्ये अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानजीक एसटी वर्कशॉपच्या जागेमध्ये एक अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभा करण्याचा अजित पवार यांचा मानस आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केलेले आहेत. बारामती मध्ये जर कॅन्सर रुग्णालय सुरू झाले, तर केवळ बारामतीच नाही तर पंचक्रोशीतील अनेक रुग्णांना या हॉस्पिटलचा थेट फायदा होणार आहे. अजित पवार यांची कामाची पद्धत विचारात घेतात निश्चितपणे अजित पवार हे रुग्णालय बारामतीत उभे करतील अशी खात्री बारामतीकरांना वाटते.

लोकांचा कार्यक्षमता, निर्णयप्रक्रियेवर विश्वास
राजकीय कुरघोड्या करण्यापेक्षा व विनाकारण चर्चा करत बसण्यापेक्षा विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कायम राजकारण व समाजकारण करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. त्यांच्या सर्वच निवडणुकांमध्ये विकासावरच त्यांनी भर दिला व शहराच्या सर्वांगीण विकासाच्या योजना प्रत्यक्षात उतरवून त्यांनी मतदारांना आपलेसे केले. अजित पवार यांची कार्यक्षमता व धडाडी यावर बारामतीकरांनी कायम विश्वास ठेवत त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले. बारामती व अजित पवार हे अतूट समीकरण गेल्या काही वर्षात निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस देखील अजित पवार आमदार नसतील तर बारामतीच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होईल, या एकाच मुद्द्यावर अजित पवार एक लाखांहून जास्त मतांनी विजयी झाले. त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि निर्णय घेण्याचा प्रक्रियेवर आजही लोकांचा तितकाच विश्वास आहे ही बाब महत्त्वाची म्हणावी लागेल.

परदेशाच्या धर्तीवर शहराचा विकास
बारामती शहरातील अनेक विकासाचे प्रकल्प पाहिल्यानंतर राज्यभरातून येणाऱ्या प्रत्येकालाच अचंबित व्हायला होतं. आपल्या मतदारसंघाची बारामती केव्हा होणार... याची चर्चा बारामतीत आल्यानंतर बाहेरगावचे लोक करताना दिसतात. छोटसं पण टुमदार व हरित शहर असल्यामुळे अनेक बाबतीत बारामतीला प्राधान्य मिळत जाते. परदेशाच्या धर्तीवर या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला असून लोकांनीही त्याला भरभरून पाठिंबा दिला आहे. येत्या काही वर्षात अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेऊन ते पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा संकल्प आहे. विकासाची प्रक्रिया सुरू असली तरी अजून शंभर टक्के विकास झाला आहे असे खुद्द अजित पवार यांचेही मत नाही, त्यामुळे ही विकासाची प्रक्रिया कायमस्वरूपी चालणारी असून, त्यामध्ये प्राधान्यक्रम निश्चित करून अधिकाधिक लोकांना ज्याचा जास्त फायदा होईल, अशा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून ती कार्यान्वित करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून कायम केला जातो.

बारामतीकरांनी प्रचंड मताधिक्य देऊन माझी जबाबदारी वाढवलेली आहे, त्यामुळे प्रत्येक दिवस हा नागरिकांसाठी खर्च करून त्या माध्यमातून या शहराचा कायापालट करण्याचा व देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून बारामतीचे नावलौकिक व्हावा या दृष्टीने माझे प्रयत्न असतात, असे अजित पवार यांनी जाहीरपणे अनेकदा सांगितले आहे. बारामती शहर स्वच्छ व सुंदर तसेच हरित राहील या दृष्टीने बारामतीकरांनी देखील अजित पवार यांना या प्रयत्नात मदत करणे याच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खऱ्या शुभेच्छा ठरतील, असे वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Deshmukh: विधीमंडळात ज्या नितीन देशमुखांना मारहाण झाली ते नेमके कोण आहेत?

Kolhapur Killing Case : रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन बेनाडेचा खून, संशयित आरोपी पोलिसांना शरण; संकेश्र्वरात मृतदेहाचा शोध सुरू

Morning Diet: सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? डॉक्टरांनी सांगितले कारण

मे-जूनमध्ये शेतीत काम नसतं, शेतकरी रिकामेच असतात.. तेव्हा गुन्हेगारी वाढते; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं विधान

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची कर्जप्रकरणे थंडबस्त्यात; अण्णाभाऊ साठे महामंडळातील वास्तव,नागपुरात केवळ एकाच महिलेला कर्ज!

SCROLL FOR NEXT