पुणे

कर्तबगार नेतृत्वाला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळायला हवी

CD

कर्तबगार नेतृत्वाला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळायला हवी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याभोवती आज जे प्रसिद्धीचे वलय दिसते, त्या मागे त्यांनी १९८४ पासून केलेले प्रचंड कष्ट व परिश्रम आहेत. याची जाणीव फार कमी लोकांना आहे. सुदैवाने दादांच्या राजकीय कारकिर्दीच्या अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांच्यासोबत काम करीत आहे. त्यामुळेच मला त्याच्या संघर्षाचा जवळून परिचय आहे.
- किरण गुजर, अध्यक्ष, नटराज नाटय कला मंडळ, बारामती

ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या घराण्यातील व्यक्तिमत्त्व म्हणून अजितदादा पवार यांची ओळख सुरुवातीला असली तरी नंतरच्या काळात त्यांनी स्वतःची एक वेगळी राजकीय ओळख निर्माण केली. राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी कष्ट व संघर्षातून त्यांनी वाटचाल केली. पवार कुटुंबीयांपैकी एक घटक असतानाही बारामती तालुक्यात सुरुवातीच्या काळात अजितदादांनाही टोकाचा विरोध काही मंडळींनी केला होता. आपल्या कामाच्या तडफेने त्यांनी या तालुक्यात स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली.

सुरुवातीपासूनच दादांची कार्यशैली वेगळी
राजकारणात असूनही अगदी सुरुवातीपासूनच अजितदादा पवार यांनी आपली कार्यशैली वेगळी ठेवली होती. काही जणांना ही कार्यशैली आवडत नव्हती, तरीही बारामती तालुक्यातील मतदारांनी मात्र अजित पवार यांच्या विकासाच्या भूमिकेवर कायम विश्वास ठेवला व आजही ते त्यांच्या पाठीशी तितक्याच ताकदीने उभे आहेत. हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. लोकांसाठी ते काम करत आले आणि लोकांनी कायमच त्यांच्यासाठी निवडणुकीत काम केले आणि त्यांना निवडून दिले.

विकासाच्या दृष्टीने धाडसी निर्णय
कोणताही निर्णय घेताना अजितदादा पवार तो विचारपूर्वक घेतात आणि त्या निर्णयाचे काय परिणाम होतील व काय पडसाद उमटतील याचा त्यांना अचूक अंदाज असतो. अगदी सुरवातीपासूनच या शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले, ते प्रत्यक्षात उतरवून दाखविले. हे निर्णय घेताना अनेकदा त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले, मात्र तरीही व्यापक जनहित विचारात घेत त्यांनी लोकांच्या भल्यासाठीचे निर्णय खंबीरपणे घेतले.

विकासासाठी महायुती सोबत जाण्याचा निर्णय
मध्यंतरीच्या काळात बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्या राजकीय घडामोडींच्या काळात दादांसबोत मी होतो. हा निर्णय घेताना त्यांनी इतर सर्व मुद्द्यांपेक्षा बारामतीचा सर्वांगिण विकास हाच मुद्दा नजरेसमोर ठेवून महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पक्षाची विचारधारा कोणत्याही परिस्थितीत न बदलता विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचे ठरविले.

मतदारांच्या भवितव्याचा कायम विचार
काहीही झाले तरी बारामती विधानसभा मतदारसंघाचा विकास कोणत्याही परिस्थितीत खंडित होता कामा नये, विकासाचा वेग कायम राहिला हवा ही एकच भूमिका नवीन समीकरणांमागे होती. काही राजकीय निर्णय घेताना अजितदादा पवार यांच्या मनाची मोठी घालमेल झाली. राजकारण आणि कुटुंब असा पेच त्यांच्यासमोरही उभा ठाकला होता. मात्र, तरीही वैयक्तिक विचार न करता त्यांनी या मतदारसंघातील मतदारांच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घेतला. केवळ बारामतीचाच नव्हे तर राज्याच्या विकासाचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. या मोठ्या निर्णयानंतर अजितदादा पवार यांना वैयक्तिक टीकेला सामोरे जावे लागले. अनेकदा त्यांच्यावर टोकाची वैयक्तिक स्वरूपाची टीका झाली. मात्र, तरीही खंबीरपणे त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करीत या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे वारंवार नमूद केले.

निमूटपणे मोठ्या मनाने केली टीका सहन
काही राजकीय गोष्टी अजितदादा पवार जाहीरपणे बोलून दाखवत नसले तरी त्यांच्या काहीही चुका नसताना त्यांना अनेकदा खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला गेला. कोणत्याही परिस्थितीत कोणाचा अवमान होऊ नये या उद्देशाने दादांनी तोंड उघडले नाही. अनेकदा
काहीही चूक नसताना त्यांनी निमूटपणे मोठ्या मनाने टीका सहन केली. अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे असूनही त्यांनी प्रश्न टाळत मनाचा मोठेपणा दाखविला. सामूहिक निर्णय असतानाही स्वतःवर जबाबदारी घेत अनेक गोष्टी सहन केल्या.

राज्य पिंजून काढत कार्यकर्त्यांना विश्वास
लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर काहीसे खचून गेलेल्या अजितदादांनी विधानसभा निवडणुकीत अधिक तयारीने उतरण्याचा निर्णय घेतला. राज्य पिंजून काढत कार्यकर्त्यांना विश्वास देत ते निवडणुकीला सामोरे गेले. बारामतीतील मतदारांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. लोकसभा निवडणुकीची गोष्ट वेगळी होती, विधानसभा निवडणुकीत मात्र मतदार आपल्या पाठीशी उभा राहील हा त्यांचा विश्वास बारामतीकरांनी खरा करून दाखवीत त्यांना एक लाखाहून अधिकच्या मताधिक्याने विजयी केले.

लोकांच्या भल्यासाठीच वेगळी भूमिका
लोकांच्या भल्यासाठी वेगळी भूमिका घेण्याची वेळ येते, तेव्हा दादांइतका खंबीर व कणखर नेता मी आजवर कधी पाहिलेला नाही. ते कधीच निर्णय घेताना डगमगत नाहीत, व्यापक जनहित विचारात घेत. प्रसंगी कटुता स्वीकारून व अनेक मान्यवरांची नाराजी पत्करून निर्णय घेतात. कालांतराने त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता, याची सर्वांना जाणीव होते. बारामतीत आज जी विकास कामे झालेली आहेत ती उभी करताना अजितदादा पवार यांनी अनेकांचा वाईटपणा घेतला आहे, याचा मी साक्षीदार आहे. अर्थात त्यामुळेच या शहराचा हा विकास झाला आहे.


‘माळेगाव’च्या सभासदांवर पूर्ण विश्वास
नुकत्याच झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूतीच देखील अनेकांनी दादांना या निवडणुकीमध्ये धोका पत्करू नका. असा सल्ला दिला होता. दादांचा मात्र माळेगाव कारखान्याच्या सभासदांवर पूर्ण विश्वास होता. सभासद आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, ही खात्री त्यांना होती. या कारखान्याची निवडणूक त्यांनी अतिशय गांभीर्याने घेत प्रसंगी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत हे विसरून जात, प्रत्येक सभासदाची वैयक्तिक संवाद साधत, कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीचा शब्द देत, ही निवडणूक अक्षरशः विरोधकांकडून खेचून आणली. एक उमेदवार या नात्याने त्यांनी प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला व कोणतीही निवडणूक आपण हलक्यात घेत नाही, हेच दाखवून दिले. बारामती तालुक्यात नेमकी कोणाची ताकद आहे हेही या निमित्ताने सर्वांसमोर आले.

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी पृथ्वीराज जाचक यांच्याशी जमवून घेतले. त्याच पद्धतीने माळेगावमध्ये देखील त्यांना निवडणूक लढविण्यात फार रस नव्हता. मध्यस्थीच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण ताकदीनिशी आपण अजितदादा पवार आहोत हेच विरोधकांना दाखवून दिले. दादांनी मनात आणले तर काय होऊ शकते हे वीस विरुद्ध एक या निकालानंतर पुन्हा अधोरेखित झाले.

दादांकडून कामे तातडीने कामे मार्गी
अनेकदा अजितदादा पवार हे कडक स्वभावाचे आहेत, असे बोलले जाते. मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या समवेत काम करीत आहे. सामान्य माणसाच्या कामाचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा ते हळवे होतात व त्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्याचे काम मार्गी लावून देतात. इतर कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या तुलनेत दादा अतिशय वेगवान निर्णय घेतात व कामे तातडीने मार्गी लावतात हे मी अनेकदा अनुभवले आहे.

विरोधकही दिलखुलासपणे अजितदादांसोबत
विधानसभा निवडणूक असो किंवा माळेगाव कारखान्याची निवडणूक असो दादांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये माणसे जोडण्याचे काम केले. या माणसांनी त्यांच्या प्रत्येक निवडणुकीच्या काळात मदतीचा हात दिला. अगदी विरोधक असले तरीसुद्धा त्यांच्या कार्यपद्धतीवर फिदा होत विरोधकांनी देखील दिलखुलासपणे अजितदादांसोबत उभे राहत. आम्ही राजकारणापेक्षा विकास करू पाहणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतो हे दाखवून दिले.
राज्यामध्ये सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी अनेक आहेत. कामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून विकासाच्या माध्यमातून लोकांची मने जिंकणारा दादांसारखा नेता विरळच. कामाने झपाटलेला नेता असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. प्रचंड उत्साह आणि तितक्याच वेगाने काम करण्याची त्यांची पद्धत यामुळे या शहराचा कमी कालावधीत अधिक विकास झाला आहे.

विधानसभेत मिळालेले यश त्यांचेच
राजकीय मतभेदानंतर अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. खऱ्या अर्थाने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले, त्यानंतर त्यांनी पक्ष वाढीसाठी मोठे प्रयत्न केले. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेले यश हे निर्विवादपणे त्यांचेच होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत यश खेचून आणल्याने महाराष्ट्रात अजितदादा पवार या नावाची एक वेगळी ताकद आहे हे या निमित्ताने स्पष्ट झाले.

चांगल्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
चांगल्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे, असे मला वाटते. चांगलं काम करणाऱ्या माणसाविषयी कोणीही त्यांना कितीही काहीही सांगितले, तरी ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. काम करणाऱ्या माणसाला ते सातत्याने प्रोत्साहन देत राहतात, हा त्यांचा गुण आहे. मुळे काम करणाऱ्या माणसाला देखील करत असलेल्या कामाचे वेगळे समाधान मिळत असते.

दादांमुळेच साकारली नटराज मंदिराची वास्तू
नटराज नाटय कला मंडळाच्या बाबतीत देखील अनेकदा अजितदादा पवारांना अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. मात्र, प्रत्येक वेळेस अजितदादा पवार हे माझ्या व नटराज परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज नटराज नाट्य कला मंदिराची एक सुंदर वास्तू बारामतीत साकारली आहे. या मागे अजितदादा पवार यांचे मोलाचे योगदान आहे.

राज्याचे मुख्यमंत्रिपद दादांना अनेकदा हुलकावणी देऊन गेले. येणाऱ्या काळात एका अतिशय सक्षम व कर्तबगार अशा या नेतृत्वाला मुख्यमंत्रिपदी काम करण्याची संधी मिळायला हवी, अशीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वरचरणी प्रार्थना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor injured: प्रशांत किशोर यांना रॅलीदरम्यान मोठी दुखापत; पाटणामधील रूग्णालयात उपचार सुरू!

Shocking! अनेकांसोबत शारीरिक संबंध; १०० कोटी उकळले, 'ती' महिला नेमकी कोण? धक्कादायक सत्य समोर

Pahalgam attack: 'टीआरएफ'चा जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश; भारताकडून निर्णयाचं स्वागत

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT