बारामती, ता. १९ : बारामती आगाराच्या सोमवारी (ता. १८) एकाच दिवशी तीन एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. नादुरुस्त एसटीमुळे पुण्याहून बारामतीला एसटीने येणे प्रवाशांसाठी दिवसेंदिवस दिव्य बनत चालले आहे.
देखभाल दुरुस्ती व्यवस्थित नसल्याने वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बारामती आगाराला चांगल्या सुस्थितीतील बसेस मिळाव्यात या विनंतीकडेही दुर्लक्ष होताना दिसत आहे. सोमवारी गुणश्री रासकर या नोकरीच्या मुलाखतीसाठी पुण्याला गेल्या होत्या. संध्याकाळी पाच वाजता स्वारगेटहून बारामतीला येण्यासाठी बसमध्ये (क्र. एमएच १४ बीटी ३२५३) बसल्या. मात्र, हडपसरमध्ये ही बस तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली.
या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसविण्यात आले. ही बसही कशीबशी फुरसुंगीपर्यंत आली. मात्र, उड्डाणपुलावर ही बसही बंद पडली. प्रवाशांनीच धक्का मारून ही बस रस्त्यातून एका बाजूला घेतली. त्यानंतर तिसऱ्या बसमध्ये उर्वरित प्रवाशांना बसविण्यात आले. या तिसऱ्या बसमध्ये बसलेले व उभे राहून प्रवास करणारे असे जवळपास ७० प्रवासी होते. दिवे घाट चढत असताना या बसच्या चाकातील हवा गेली. हवा गेल्याने बस दरीच्या दिशेने जाऊ लागली पण चालकाने प्रसंगावधान राखून विरुद्ध दिशेला बस नेली व डोंगराच्या बाजूला बस धडकून थांबली. यात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
सलग तीन बसेसमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. दिवे घाटात एकीकडे पाऊस, तर दुसरीकडे अंधार अशा स्थितीत प्रवासी उभे होते. यात महिलांची संख्या मोठी होती. यातही विशेष म्हणजे या तीनही बसेस बारामती आगाराच्याच होत्या. एकाच बसमध्ये ७० प्रवाशांची वाहतूक करणे हे तर नियमबाह्य होतेच शिवाय प्रवाशांच्या जिवाशी हा खेळ होता. घरी लवकर पोहचण्याची घाई असल्याने अनेकांनी उभ्याने प्रवास केला.
या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा वनिता बनकर यांनी विभाग नियंत्रक अरुण सिया व बारामतीचे आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांना निवेदन देत या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली.
पर्यायी बसची व्यवस्था झालीच नाही
तीन बसेस रस्त्यात बंद पडल्यानंतरही एसटी प्रशासनाने प्रवाशांसाठी पर्यायी बसची व्यवस्था केली नाही. ही यातील संतापजनक बाब असल्याचे प्रवाशांनी सांगितले. मागून येणाऱ्या बसमध्ये अक्षरशः प्रवासी कोंबून पाठविले गेले. साठहून अधिक प्रवासी बसविणाऱ्या प्रशासनावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
एकाच बसमध्ये साठहून अधिक प्रवाशांना बसविल्यानेच दिवे घाटात टायरमधील हवा गेली. हा प्रकार प्रवाशांच्या जिवाशी खेळणारा होता. या पुढील काळात तरी असे प्रकार घडू नयेत याची काळजी घेतली जावी.
- गुणश्री रासकर, बारामती.
या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून, यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहोत. यात कोणालाही पाठीशी घालणार नाही.
- रविराज घोगरे, आगार व्यवस्थापक, बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.