बारामती, ता. ४ : शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला बारामतीचा सीसीटीव्ही प्रकल्प लाल फितीत अडकून पडला आहे. हा प्रकल्प गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय स्तरावर रेंगाळत असल्याने हा प्रकल्प मार्गी लागण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बारामतीकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहर व परिसरात ३२० कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक हालचाली, घडामोडींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे केला जाणार आहे. यासाठी अनेकदा प्रस्ताव तयार झाले, त्यात काही त्रुटी मुंबई स्तरावर काढल्या गेल्या, त्यांची पूर्तता केल्यानंतर पुन्हा काही कारणे काढून हा प्रस्ताव लांबविला गेला. वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा होऊनही काही दिवसांपूर्वी हा प्रस्तावच रद्द झाला.
हा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर तो पुन्हा शासकीय धोरणांनुसार तयार करण्यात आल्याची माहिती आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकल्प लवकर सुरू व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र, प्रशासकीय घोडे नाचविण्याच्या पद्धतीमुळे पाच वर्षांहून अधिक काळ उलटूनही याबाबत मुंबई स्तरावर कागदपत्रात फक्त त्रुटीच काढल्या जात आहेत.
शहरात वाहनचोरीसह, दागिने चोरी, खुनासारख्या घटनाही घडल्या. या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे ही बारामतीची गरज आहे. अनेक चुकीच्या बाबी कॅमेऱ्याच्या धाकामुळे घडणार नाहीत, अशी खात्री पोलिस विभागालाही आहे. मात्र, त्रुटी काढण्याच्या प्रकाराने बारामतीचा हा प्रकल्प लाल फितीतच अडकून पडला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाबाबत फक्त बैठका आणि बैठकाच झाल्या. प्रत्यक्षात प्रकल्प काही साकारलाच नाही. हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, असे पोलिस अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात अजूनही शासकीय स्तरावर ही फाइल कासवगतीने पुढे सरकत असल्याचे चित्र आहे.