पुणे

बारामतीत थंडीतही मतदारांचा उत्साह

CD

बारामती, ता. २० : नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता. २०) ६६.९२ टक्के मतदान झाले. दुपारी तीननंतर मतदानाने वेग घेतला होता. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शेवटच्या दोन तासांत मोठी गर्दी झाली होती. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी अचानकच गर्दी केल्याने साडेपाच वाजता जितके मतदार मतदान केंद्रात उपस्थित होते, त्यांना चिठ्ठ्यांचे वाटप केले गेले. अशा मतदान केंद्रांवर पावणेसात वाजेपर्यंत मतदान सुरु होते. ३३ नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले.
तब्बल नऊ वर्षानंतर बारामती नगरपरिषदेची पुन्हा निवडणूक होत असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पंकज भुसे यांनी मतदानाची प्रक्रीया शांततेत पार पडल्याची माहिती दिली. किरकोळ वादविवाद वगळता बारामती नगरपरिषदेचे मतदान शांततेत पार पडले, कोठेही काहीही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली. काही ठिकाणी कार्यकर्त्यात किरकोळ वादावादी झाली.
शनिवारी (ता. २०) बारामतीत आठ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. थंडीच्या पार्श्वभूमीवर सकाळी साडेअकरापर्यंत अवघे सहाच टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाने वेग घेतला. अकरानंतर लोक मतदानासाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजाविला.
बारामतीतील मतदान केंद्रांवर बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांची नियुक्ती केल्याचे सांगितले गेले, मात्र अनेक मतदान केंद्रावर बीएलओ लोकांना दिसलेच नाहीत. अनेकांना मतदारयादीतील नाव व क्रमांक सापडत नव्हता. त्यासाठी बीएलओची मदत घ्या, असे मतदान केंद्रातील कर्मचारी सांगत होते, पण बीएलओ जागेवरच नव्हते. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांची नावे व मोबाइल नंबर माहिती नव्हते. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरिक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, चंद्रशेखर यादव, नीलेश माने यांच्यासह पोलिस अधिका-यांनी मतदान केंद्रांना भेटी देत सुरक्षेचा आढावा घेतला.

मोबाइलमुळे गोंधळ
मतदारांना मतदान केंद्रात मोबाइल नेण्यावर पोलिसांनी बंदी घातल्याने सर्वच मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण होते. मतदारांना या नियमाची कल्पना नसल्याने अनेकांना मोबाइल कोणाकडे ठेवायचे? असा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक मतदार या नियमामुळे मतदान न करताच निघूनही गेले. याबाबत आरडाओरडा होऊनही परिस्थितीत फरक पडला नाही.

आज मतमोजणी
रविवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता रेल्वे स्थानकासमोरील म.ए.सो.च्या ग. भि. देशपांडे विद्यालयाच्या हॉलमध्ये मतमोजणी सुरु होईल. सुरवातीला पोस्टल मते मोजण्यात येणार आहेत. त्यानंतर वीस टेबलवर ईव्हीएम यंत्रातील मते मोजली जातील. सहा फेऱ्यांमध्ये सर्व मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होणार आहे. सुरवातीला एक ते चार प्रभागातील मते मोजली जातील, त्यानंतरच्या टप्प्यात पुढील प्रभागातील या नुसार मतमोजणी होणार आहे.

वाहतुकीत बदल
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील भिगवण रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. रविवारी (ता. २१) पहाटे पाच ते रात्री आठ वाजेदरम्यान बारामतीतून भिगवणकडे जाणारे वाहतूक तीन हत्ती चौक- माळावरची देवी-कोर्ट कॉर्नर मार्गे रिंग रोडने भिगवणकडे वळविण्यात येईल, भिगवण चौक, एडवायझर चौक टी.सी. कॉलेज सातव चौक मार्गे सम्यक चौक भिगवणरोडकडे वळविण्यात येणार आहे.

• किती जागांसाठी निवडणूक- ३३ नगरसेवक व नगराध्यक्षपद
• एकूण मतदारसंख्या (पुरुष/महिला/इतर)- पुरुष- ५०३८३. स्त्री-५१५९५ एकूण मतदान- १०१९९२ (मागील निवडणुकीत सन
२०१६ मध्ये मतदारसंख्या ७५२७६ इतकी होती. नऊ वर्षात मतदारसंख्येत २६७१६ मतदारांची वाढ झाली आहे.)
• रामगल्ली व तांबेनगर मेडीकोज गिल्ड हॉल ही दोन केंद्र पिंक मतदान केंद्र- सर्व अधिकारी व कर्मचारी महिला होत्या.

• मतदानाची टक्केवारी- ६६.९२

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT