कायमस्वरूपी वास्तव्यासाठी
सर्वोत्तम पर्याय
बारामती
बारामतीचा चेहरामोहरा गेल्या दोन तीन दशकात बदलला. छोटेसेच पण टुमदार व सर्वसोयींनीयुक्त असे हे शहर वास्तव्यासाठी सर्वाधिक अनुकूल असे बनले आहे. नोकरी, व्यवसायासह अगदी निवृत्तीनंतरचा काळ सुखात घालविण्यासाठी बारामतीत स्थायिक होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली आहे. परिपूर्ण विकासामुळे बारामतीकडे लोकांचा ओढा वाढला आहे. नियोजनबद्ध विकासामुळे वाढत्या नागरीकरणाचा अर्थकारणावर सकारात्मक परिणाम दिसतो आहे. गेल्या काही वर्षात बारामतीच्या विकासासाठी जी पावले उचलली, त्यामुळे खऱ्या अर्थाने या शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. केवळ सुशोभीकरणच नाही, तर सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांमुळे वास्तव्यासाठी सर्वात सुंदर व सुरक्षित शहर म्हणून बारामतीचा आता उल्लेख होत आहे. कायमस्वरूपी वास्तव्यासाठी महाराष्ट्रात आता बारामती हा सर्वोत्तम पर्याय निर्माण झाला आहे.
- मिलिंद संगई, बारामती
बारामतीचा सर्वांगिण विकास गेल्या दोन- तीन दशकांमध्ये वेगाने झाला. येथील शासकीय कार्यालयांच्या इमारतींनी कात टाकली. नागरिकांना या इमारतीत गेल्यानंतर एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयात आल्याचा फील येतो. लोकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुखकर व्हावे, याचा विचार करून येथील नेतृत्वाने जाणीवपूर्वक विकासाला दिशा दिली. त्याचा चांगला परिणाम बारामतीच्या एकूणच अर्थकारणावर झाला आहे. बारामतीतील बाजारपेठेला तर चालना मिळालीच, पण येथील बांधकाम क्षेत्रासह अन्य उद्योगांनाही अच्छे दिन आले आहेत.
ब्रँड शॉप्सचा प्रवेश
जी ब्रँड शॉप्स पुण्यामुंबईत होती व ज्यांना ब्रँडच्या वस्तू वापरण्याची आवड होती, त्यांना पुण्याशिवाय पर्याय नव्हता. गेल्या काही वर्षात बारामतीचा विकास झाला, तशी अनेक ब्रँड शॉप्स बारामतीत दाखल झाले. लोकांच्या राहणीमानात झालेला बदल, उंचावलेला स्तर यामुळे या शॉप्सच्या चेन बारामतीत स्थिरावल्या. तरुणाईची गर्दी या दुकानातून वाढू लागली आणि त्याचा परिणाम अनेक नवीन कुटुंबांनी व्यवसायात पदार्पण केले. काही ठिकाणी भाडेतत्त्वावर जागा घेत, तर काहींनी स्वमालकीच्या जागेत व्यवसायात पर्दापण केले.
बांधकाम क्षेत्राची भरारी
या विकासाचा परिणाम बांधकाम क्षेत्रावरही दिसला. बांधकाम व्यावसायिकांची संख्याही गेल्या दोन दशकात वाढली. अनेक युवकांनी या क्षेत्रात आपले नशीब आजमावले. निवासी व व्यावसायिक असंख्य प्रकल्प या काळात बारामतीत उभे राहिले. विशेष म्हणजे सर्वांनीच उभ्या केलेल्या इमारतींना ग्राहकही मिळाले. आज बारामतीत बारा मजल्यांचे अनेक प्रकल्प साकारत आहेत. भविष्यात 19 मजल्यांची इमारत उभारण्याची तयारी काही व्यावसायिकांनी सुरु केलेली आहे. मोठी शोरूम, कार्यालय, संस्था यासह दुकानांसाठी, तर दुसरीकडे तीन, चार व पाच बेडरूमचे फ्लॅटही लोक सहजतेने खरेदी करताना दिसतात. शहराच्या काही भागात फ्लॅटच्या किमती कोटींच्या घरात जाऊनही लोक ते खरेदी करत आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचा उत्साह दुणावला आहे. या क्षेत्राने भरारी घेतल्याने अनेक पूरक व्यावसायिकांना त्याचा फायदा झाला, रोजगारनिर्मिती अधिक झाली.
बाजारपेठेला ऊर्जितावस्था
बारामती शहरातील पारंपरिक बाजारपेठेतही दुकानदारांनी अंतर्गत सजावट, लाइट व्यवस्था बदलली. अधिक आकर्षक रंगसंगती करून ग्राहकांना आवडेल असे वातावरण निर्माण केल्यामुळे येथेही ग्राहकांची वर्दळ अधिक वाढली. पूर्वी बारामतीतील दुकानात दिव्यांचा वापर फारसा केला जात नव्हता, मात्र परराज्यातील काही जणांनी बारामतीत नव्याने दुकाने सुरु केल्यानंतर दिव्यांचा वापर वाढविल्यानंतर बारामतीत आता तो ट्रेंडच सुरु झाला आहे. या बाजारपेठेतही गेल्या दोन दशकात मोठी स्थित्यंतरे झाली. पुणे, सातारा, नगर व सोलापूर या चार जिल्ह्यांतून ग्राहक बारामतीत खरेदीसाठी येतात. बारामतीच सोने नावाजलेले असल्याने लग्नसराईत सोने खरेदी व बस्ता बांधण्यासाठी गर्दी असते. याचा हॉटेल
व्यावसायिकांनाही फायदा होतो.
शिक्षणाच्या सुविधांमुळेही पसंती
बारामतीत महाविद्यालयीन व शालेय मिळून एक लाखांहून अधिक विद्यार्थी विविध संस्थांतून शिक्षण घेत आहेत. गेल्या दशकभरात बारामतीत ॲकेडमींची संख्या लक्षणीयरित्या वाढली. जोडीला पारंपरिक शिक्षण देणाऱ्या शाळा महाविद्यालयांचीही संख्या अधिक असल्याने, लोकसंख्या वाढत असल्याने शाळांचीही संख्या वाढत असल्याचा परिणाम बारामतीत वास्तव्यासाठी लोक येऊ लागले आहेत. अनेक जणांनी बारामतीत सदनिका विकत घेतल्या आहेत, तर काही जण भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी वास्तव्य करत आहेत. त्याचा चांगला परिणाम बारामतीच्या अर्थकारणावर झाला आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठा फायदा यातून होत आहे. आता बारामती नवीन एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) हब म्हणून उदयास आले आहे. कृषी क्षेत्रासोबतच उत्पादन व इतर बाबीमध्ये एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे संशोधन व प्रशिक्षण बारामतीत होणार आहे. मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्डसारख्या कंपन्या बारामतीत आलेल्या आहेत, ही बाब आवर्जून नमूद करण्याजोगी आहे.
नवीन व्यवसाय उदयास
पूर्वी बारामतीचा विस्तार मर्यादित होता. आता बारामतीचा विस्तार वाढला तशी काळाची पावले ओळखत अनेकांनी नवीन व्यवसाय सुरु केले. बसमधून विद्यार्थ्यांना शाळेत महाविद्यालयात पाठविणे ही संकल्पना पूर्वी नव्हती, आता ती सर्रास वापरली जाते. अनेकांनी आता बस घेऊन त्यांचा व्यावसायिक वापर सुरु केला आहे, अनेकांच्या हाताला त्याने काम उपलब्ध झाले आहे.
दळणवळणाच्या सुविधेमुळेही परिणाम
रस्ते, रेल्वे या दोन्ही बाबतीत गेल्या काही वर्षात चांगली सुधारणा झाल्याचा परिणाम बारामतीच्या सर्वांगिण विकासावर झालेला दिसतो. बारामतीला येऊन मिळणाऱ्या सर्वच रस्त्याचा अजित पवार यांनी विकास केल्याने त्याचा चांगला परिणाम होत आहे. नीरा, फलटण, मोरगाव, पाटस, भिगवण, इंदापूर या सर्व बाजूंकडून बारामतीत येणारे सर्वच रस्ते चकाचक आहेत. बारामतीत सहजतेने पोहोचता येत असल्यानेही बारामतीच्या बाजारपेठेला ऊर्जितावस्था आली आहे.
हॉटेलची संख्याही वाढली
पूर्वी बारामतीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच हॉटेल होती. गेल्या काही वर्षात शहराच्या सर्व भागात छोट्या मोठ्या हॉटेलची संख्या लक्षणीय वाढली. मोक्याच्या जागा बघून लोकांनी त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार हॉटेल्स सुरु केली व आज सर्वच हॉटेलमध्ये कमी अधिक प्रमाणात गर्दी दिसून येते. शहरात असणाऱ्या स्विगी, झोमॅटोसारख्या चेन्स बारामतीत कार्यरत आहेत. मॅकडोनल्ड, पिझ्झा हट, केएफसी, डॉमिनोज यांचा बारामतीत प्रवेश झालेला असून, येत्या काही दिवसात अनेक ब्रँड बारामतीत सुरु झालेले दिसतील. लोकांची वर्दळ वाढल्याने बारामतीतही तुम्हाला खाण्यासाठी हवे ते मिळू शकते. अनेक बारामतीकरांनी स्वतःचे ब्रँड विकसित करून त्याच्या शाखा इतरत्र सुरु केल्या आहेत.
गुंतवणूक ठरते लाखमोलाची
बारामतीचा विकास ज्या गतीने होतो आहे, त्याचा विचार करता बारामतीतील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक लाखमोलाची ठरत आहे. सदनिका, व्यापारी गाळा, ऑफिससाठीची जागा, रिकामे प्लॉट किंवा शेत जमीन या सर्वात केलेल्या गुंतवणुकीला अल्पावधीतच चांगली भाववाढ मिळत असल्याने बारामतीत गुंतवणुकीकडे लोकांचा ओढा वाढू लागला आहे. शिवसृष्टी, वनउद्यान, आयुर्वेदिक महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, रेल्वे स्थानक या सारख्या नवीन प्रकल्पांमुळे बारामतीच्या बाहेर देखील जागेला सोन्याचे भाव आले आहेत. लोक भविष्यात चांगला परतावा मिळेल, या अपेक्षेने मोठी गुंतवणूक जमिनीत करताना दिसत आहेत. अनेकांनी या व्यवहारातून कोट्यवधींची कमाईदेखील केली आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी बारामतीत जमिनी घेत नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. भव्य व्यावसायिक प्रकल्प बारामतीत साकारत असून येत्या दोन तीन वर्षात आणखी काही मोठे प्रकल्प येथे सुरु होणार आहेत.
शासकीय सुविधांचा विस्तार फायदेशीर
शहराचा वाढणारा विस्तार विचारात घेत शासकीय स्तरावरही लोकांना शासकीय कामे पूर्ण करून घेण्यासाठी पुण्याला जावे लागू नये, या साठी बहुसंख्य शासकीय कार्यालयांची बारामतीतच निर्मिती केल्याचाही सकारात्मक परिणाम अर्थकारणावर झालेला दिसतो. पोलिस उपमुख्यालयापासून महावितरणचे परिमंडल कार्यालय, जिल्हा न्यायालयापासून ते आरटीओचे तीन तालुक्यांचे कार्यालय, पासपोर्टच्या सुविधेपासून ते दस्तनोंदणी व मोजणीची कार्यालय बारामतीत आहेत, याचा फायदा होत आहे.
मुलभूत सुविधांचा स्तर सुधारला
रस्ते, वीज, पाणी, भुयारी गटार योजना, स्वच्छता, पथदिवे, आरोग्याच्या सोयी यासारख्या ज्या मुलभूत सुविधांची एखाद्या शहरात वास्तव्य करताना गरज भासते, त्या सर्वोत्तम दर्जाच्या देण्यासाठी बारामतीत जाणीवपूर्वक प्रयत्न नेतृत्वाकडून केले गेले. त्यामुळेही बारामती शहर वास्तव्यासाठी सर्वोत्तम बनले आहे. देशातील जी काही मोजकी शहरे टुमदार या श्रेणीतील आहेत, त्यात बारामतीचाही समावेश करावा लागेल.
पर्यावरणाचा समतोल कायम
बारामतीचे वैशिष्ट्य़ म्हणजे या शहरात झाडांची संख्या लक्षणीय आहे. हरित शहर म्हणून याचा उल्लेख होतो. येथे पक्ष्यांचीही संख्या मोठी आहे. जैवविविधता अजून कायम आहे. उन, पाऊस, थंडी या तिन्ही ऋतूमध्ये बारामतीचे वातावरण अत्यंत आल्हाददायक असते, प्रदूषणाचा स्तरही बारामतीत नगण्य आहे. पहाटे किंवा संध्याकाळी फिरायला गेल्यानंतर मोकळी हवा अनुभवता येते. आरोग्य उत्तम राहते. त्यामुळेही बारामती वास्तव्यासाठी अनेक जण निवडत आहेत.
दिवंगत माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी बारामती पाहिल्यानंतर देशात बारामतीच्या धर्तीवरची शंभर शहरे उभी राहायला हवीत, असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता, बारामतीत येऊन जे हे शहर अनुभवतील, त्यांनाही निश्चित असेच वाटेल यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.